भारत-पाकिस्तान एकाच गटात नको : बीसीसीआय

वृत्तसंस्था
शनिवार, 1 ऑक्टोबर 2016

प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही एकाच गटात ठेवण्याचा प्रयत्न असतो, असे 'आयसीसी'ने यापूर्वी सांगितले होते. पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत.

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कुठल्याही स्पर्धेमधील मुख्य आकर्षण म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान ही लढत! पण आता नजीकच्या भविष्यात हा सामना न होण्याचीच शक्‍यता जास्त आहे. कारण, आगामी स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना एकाच गटात ठेवले जाऊ नये, अशी विनंती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 'आयसीसी'ला केली आहे. उरीमध्ये दहशतवादी हल्ल्यात 19 जवान हुतात्मा झाल्यानंतर भारत सरकारने सर्व पातळ्यांवर पाकिस्तानला एकाकी पाडण्याची व्यूहरचना आखली आहे.

'बीसीसीआय'चे अध्यक्ष अनुराग ठाकूर म्हणाले, "आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकाकी पाडण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. देशातील जनतेच्या भावनांचा आदर करत आम्ही 'आयसीसी'ला विनंती केली आहे, की बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवले जाऊ नये. अर्थात, अशा स्पर्धांमध्ये बाद फेरीत पाकिस्तानशी गाठ पडली, तर ते टाळता येणार नाही.''

भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये कोणत्याही मैदानामध्ये होणाऱ्या सामन्यासाठी प्रचंड गर्दी होत असते. 2012 नंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय मालिका झालेली नाही. मात्र, तेव्हापासून 'आयसीसी'च्या स्पर्धांमध्ये 14 वेळा भारत आणि पाकिस्तानचा सामना झाला आहे. यापूर्वीचा शेवटचा सामना याच वर्षी मार्चमध्ये ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेमध्ये झाला होता.

दुसरीकडे, प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही एकाच गटात ठेवण्याचा प्रयत्न असतो, असे 'आयसीसी'ने यापूर्वी सांगितले होते. पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत.

Web Title: Don't put India and Pakistan in same group, BCCI to ICC