ही पिढी, हा संघ वेगळा आहे : हार्दिक पंड्या

Monday, 9 July 2018

ट्वेंटी20 सामन्यात 10 धावांच्या सरासरीने 198 धावांचा पाठलाग करणे सहज सोपे कधीच नसते. भारतीय संघाने ब्रीस्टलचा सामना 8 चेंडू राखत जिंकत ते सहज करून दाखवले. हे यश खेळातील कौशल्याचे आहे तसेच मानसिकतेचेही आहे. सध्याचा भारतीय संघ ‘आपण हे करू शकतो’ याचा विश्वास बाळगतो. 

नॉटींगहॅम : ट्वेंटी20 सामन्यात 10 धावांच्या सरासरीने 198 धावांचा पाठलाग करणे सहज सोपे कधीच नसते. भारतीय संघाने ब्रीस्टलचा सामना 8 चेंडू राखत जिंकत ते सहज करून दाखवले. हे यश खेळातील कौशल्याचे आहे तसेच मानसिकतेचेही आहे. सध्याचा भारतीय संघ ‘आपण हे करू शकतो’ याचा विश्वास बाळगतो. 

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला, ''ही पिढी, हा संघ वेगळा आहे. आम्ही एकमेकांना साथ देतो. कौशल्याबरोबर आमच्या सकारात्मक विचारांवर विश्वास ठेवतो. आमचा सपोर्ट स्टाफ आम्हांला ‘व्यक्त’ व्हायला स्वातंत्र्य देतो म्हणून हे सर्व शक्य होत आहे. अखेर क्रिकेट हा एक खेळ आहे. कधी यश मिळते तसेच कधी नाही. पहिल्या षटकात 22 धावा गेल्या तरी मी बिथरलो नाही. माझा भाऊ क्रुणाल मला सीमारेषेवर भेटला तेव्हा त्याला मी म्हणालो की टी20 सामन्यात परिस्थिती बघता बघता बदलू शकते. झाले तसेच मी परत गोलंदाजीला आलो तेव्हा टप्पा आणि दिशेवर एकाग्रता राखत फलंदाज काय करायच्या विचारात आहे याचा विचार करून गोलंदाजी केली. चार फलंदाजांना बाद करता आले ही कमालच झाली.'' 
यानंतर त्याने मलाच उलटा प्रश्न विचारला, ''माही भाईंनी 5 झेल आणि एक रनआऊट केला याकडे तुमचे लक्ष गेले की नाही?’’ ब्रिस्टलचा सामना महेंद्रसिंह धोनीचा 501वा आंतरराष्ट्रीय सामना होता. यष्टिरक्षण करताना धोनीने चक्क 5 झेल पकडले आणि एका फलंदाजाला चपळाईने धावबाद केले. 

फलंदाजीबद्दल बोलताना हार्दिक म्हणाला, ''मला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवल्याचा मला आनंद झाला. प्रथम श्रेणीच्या सामन्यात मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केलेली आहे. ब्रीस्टल सामन्यात फलंदाजीला उतरलो तेव्हा समोर रोहित शर्मा समोर असल्याचा मला फायदा झाला. रोहित जेव्हा चांगली फलंदाजी करतो तेव्हा त्याला रोखणे अशक्य असते. मी फलंदाजी करताना आडव्या बॅटने खेळायचे टाळले. सरळ बॅटने फटका मारून मोठ्या धावा जमा करता येतात याचा मला विश्वास होता. सर्वात मोलाची गोष्ट म्हणजे भारतीय संघाने सामना जिंकून मालिका खिशात घातली आणि त्यात मला थोडे योगदान देता आले''  

सामन्यानंतर विराट कोहली प्रचंड खूश दिसला. ''संघातील तरुण खेळाडूंना संधी दिली आणि त्याचे त्यांनी सोने केले की वेगळे समाधान लाभते. पहिल्या सामन्यात लोकेश राहुलने अफलातून खेळी केली आणि तिसर्‍या सामन्यात रोहितने. हार्दिकने संधी दोनही हातांनी पकडली. मालिकेत चांगले क्रिकेट खेळून वर्चस्व गाजवता आले हे मला महत्त्वाचे वाटते'', कोहली म्हणाला.

सामन्यानंतरच्या बक्षीस समारंभाच्यावेळी धोनीची पत्नी साक्षी आणि विराटची पत्नी अनुष्का मैदानावर हजर होत्या. धोनीची मुलगी झिवा मैदानात बागडत होती. शिखर धवनचे संपूर्ण कुटुंब हजर होते. संघव्यवस्थापन खेळाडूंच्या कुटुंबीयांना वेगळा मान देऊन त्यांच्या योगदानाचे मोल राखत आहे हे दिसून आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ENG vs IND final T20 match