हेडींग्लेला रंगणार निर्णायक सामना

Monday, 16 July 2018

नॉटींगहॅमचा सामना भारताने जिंकला आणि इंग्लंड संघाने जबरदस्त पुनरागमन करत लॉर्डसचा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली. आता मंगळवारी एक दिवसीय मालिकेतला निर्णायक सामना लीडस् गावाच्या सुप्रसिद्ध हेडींग्ले मैदानावर रंगणार आहे. दोन्ही संघांचे फलंदाज रंगात येऊन फटकेबाजी करत असल्याने एक दिवसीय सामन्याचा खरा आनंद प्रेक्षकांना मिळणार आहे. 

लीड्स : नॉटींगहॅमचा सामना भारताने जिंकला आणि इंग्लंड संघाने जबरदस्त पुनरागमन करत लॉर्डसचा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली. आता मंगळवारी एक दिवसीय मालिकेतला निर्णायक सामना लीडस् गावाच्या सुप्रसिद्ध हेडींग्ले मैदानावर रंगणार आहे. दोन्ही संघांचे फलंदाज रंगात येऊन फटकेबाजी करत असल्याने एक दिवसीय सामन्याचा खरा आनंद प्रेक्षकांना मिळणार आहे. 

नॉटींगहॅम सामन्यात इंग्लंडचा जसा पराभव झाला होता त्याचा विचार करता भारतीय संघ दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालेल वाटले होते. मात्र झाले उलटेच. इंग्लंड संघाने जिद्दीने पहिली फलंदाजी करताना ३२२ धावांचा डोंगर उभारला आणि पाठलागाच्या दडपणाखाली भारतीय फलंदाजी तोकडी पडली. एका फलंदाजाने नेटाने तग धरून मोठी खेळी उभारली तर संघाची धावसंख्या कशी फुगते हेच ज्यो रूटच्या खेळीने दिसून आले. तसे बघायला गेले तर इंग्लंडचे बरेचसे फलंदाज चांगल्या लयीत फटकेबाजी करताना दिसलेले आहेत. त्यांना दडपण फक्त कुलदीप यादवला खेळायचे आहे. लॉर्डस सामन्यात कुलदीपला ३ फलंदाजांना बाद करता आले तसेच फलंदाजांनी कुलदीपचा समाचार घेत चांगल्या धावाही जमा केल्या. 

लीडस् सामन्यात उतरताना विराट कोहलीला नव्या चेंडूवर कोण चांगला मारा करेल याचा विचार करावा लागेल. गेल्या ५ सामन्यात विराटने उमेश यादव आणि सिद्धार्थ कौलवर भरवसा ठेवला आहे. उमेश यादव नव्या चेंडूवर चांगली गोलंदाजी करून नंतर स्वैर मारा करतो असे बघायला मिळाले. सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीत वेग नाही आणि चांगल्या खेळपट्टीवर चेंडू स्वींग करायची कला त्याला अवगत नाही. म्हणजेच भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराची गैरहजेरी भारतीय संघाला चांगलीच जाणवते आहे. 

भारतीय फलंदाजी चांगल्या फॉर्मात आहे. प्रमुख फलंदाजांनी आततायी फटके मारायचे टाळले तर मोठी धावसंख्या उभारणे किंवा पाठलाग करणे हाताबाहेरचे नक्कीच नाही. सध्याचा इंग्लंडमधला उन्हाचा तडाखा बघता खेळपट्टी फलंदाजीला पोषक असेल यात शंका नाही. इतर शहरांच्या तुलनेत लीडस् उत्तर भागात असल्याने कदाचित हवा थोडी गार असेल इतकेच. कोणत्या संघाचे गोलंदाज समोरच्या फलंदाजांना वेसण घालू शकतात यावर निर्णायक सामन्याचे भवितव्य विसंबून असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eng vs Ind last ODI