इंग्लंडचे भारतासमोर 322 धावांचे आव्हान

वृत्तसंस्था
रविवार, 22 जानेवारी 2017

ब्रिटीश सलामीवीर जेसन रॉय (65 धावा - 56 चेंडू) याच्यासहित जोनाथन बेअरस्टोव्ह (56 धावा - 64 चेंडू) आणि बेन स्टोक्‍स (नाबाद 57 धावा - 39 चेंडू) यांनी झळकाविलेल्या अर्धशतकांच्या सहाय्याने इंग्लंडने मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळविले.

कोलकत्ता - इंग्लंडने आज (रविवार) भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये पुन्हा एकदा 300 धावांचा टप्पा पार करत भारतीय गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट केल्या. इंग्लंडने 50 षटकांत आठ गडी गमावित एकूण 321 धावा करत भारतासमोर समर्थ आव्हान उभे केले.

ब्रिटीश सलामीवीर जेसन रॉय (65 धावा - 56 चेंडू) याच्यासहित जोनाथन बेअरस्टोव्ह (56 धावा - 64 चेंडू) आणि बेन स्टोक्‍स (नाबाद 57 धावा - 39 चेंडू) यांनी झळकाविलेल्या अर्धशतकांच्या सहाय्याने इंग्लंडने मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळविले. रॉय याने या मालिकेमध्ये तब्बल 115.78 च्या "स्ट्राईक रेट'ने सामन्यागणिक 73.33 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. या तीन फलंदाजांखेरीज इतर ब्रिटीश फलंदाजांनीही महत्त्वपूर्ण योगदान देत डावास आकार दिला. डावाच्या अखेरीस ख्रिस वोक्‍स याने 4 चौकार व 1 षटकाराच्या सहाय्याने अवघ्या 19 चेंडूंत फटकाविलेल्या 34 धावांमुळे इंग्लंडने 320 चा पल्ला गाठला.

मध्यमगती गोलंदाज हार्दिक पंड्या याने 49 धावांत मिळविलेले तीन बळी हे भारतीय गोलंदाजीचे वैशिष्ट्य ठरले. पांड्याखेरीज जसप्रित बुमराह (68 धावा - 1बळी) आणि रवींद्र जडेजा (62 धावा - 2 बळी) यांनी बळी मिळविण्यात यश मिळविले. वोक्‍स व प्लंकेट हे अखेरचे दोन ब्रिटीश फलंदाज धावबाद झाले.

तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये सलामीवीर शिखर धवन याच्याऐवजी अजिंक्‍य रहाणे याला स्थान देण्यात आले आहे. भारताने या मालिकेमधील दोन सामने याआधीच जिंकले आहेत.

Web Title: England@ 321 for 8