आक्रमक इंग्लंडचा भारतावर सहज विजय 

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 जानेवारी 2017

इंग्लंडचा भरवशाचा फलंदाज असलेल्या जो रुट याने 45 धावा करत मॉर्गन याला मोलाची साथ दिली. मॉर्गन याने अवघ्या 38 चेंडूंत चार षटकार व 1 चौकाराच्या सहाय्याने नाबाद 51 धावांची नेत्रदीपक खेळी केली

कानपूर - भारताने ठेवलेले 148 धावांचे दुबळे आव्हान सहजपणे मोडून काढत इंग्लंडने आज (गुरुवार) कानपूर येथील पहिल्या ट्‌वेंटी ट्‌वेंटी सामन्यात विजय मिळविला. फलंदाजीप्रमाणेच भारतीय गोलंदाजीच्या मर्यादाही स्पष्ट करत इंग्लंडने विजयाची नोंद केली.

ब्रिटीश कर्णधार इऑन मॉर्गन याने झळकाविलेल्या नाबाद अर्धशतकाच्या सहाय्याने इंग्लंडने अवघे तीन गडी गमावित, 18 षटकांतच हा विजय मिळविला. इंग्लंडचा भरवशाचा फलंदाज असलेल्या जो रुट याने 45 धावा करत मॉर्गन याला मोलाची साथ दिली. मॉर्गन याने अवघ्या 38 चेंडूंत चार षटकार व 1 चौकाराच्या सहाय्याने नाबाद 51 धावांची नेत्रदीपक खेळी केली.

युवा गोलंदाज युझवेंद्र चहल याने चार षटकांत 27 धावा देत मिळविलेले दोन बळी भारतीय गोलंदाजीचे वैशिष्ट्य ठरले. तत्पूर्वी, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्‌वेंटी ट्‌वेंटी सामन्यात आज (गुरुवार) भारताने प्रथम फलंदाजी करत 147 धावांपर्यंत मजल मारली. ब्रिटीश गोलंदाजांची शिस्तबद्ध गोलंदाजी व नियमित अंतराने गमाविलेले फलंदाज, यांमुळे भारतीय डावामध्ये कोणतीही मोठी भागीदारी करण्यात फलंदाजांना अपयश आले.

कर्णधार विराट कोहली (29 धावा - 26 चेंडू), सुरेश रैना (34 धावा - 23 चेंडू) यांच्यासहित महेंद्रसिंह धोनी (नाबाद 36 धावा - 27 चेंडू) यांच्या छोटेखानी खेळींमुळे भारताच्या डावास थोडाबहुत आकार आला. परंतु एकाही भारतीय फलंदाजास मोठी खेळी करण्यात यश न आल्याने भारत दिडशेच्या पलीकडे मजल मारु शकला नाही. भारतीय संघाने अर्धशतकी टप्पा ओलांडल्यानंतर लगेचच कोहली बाद झाल्यानंतर भारताने नियमित अंतराने फलंदाज गमाविले.

धोनी याने ख्रिस जॉर्डन याच्या शेवटच्या षटकांत दोन चौकार मारल्याने इंग्लंडसमोर षटकामागे किमान सातपेक्षा जास्त धावांच्या गतीने धावा करण्याचे आव्हान ठेवण्यात भारतास यश आले.

इंग्लंडकडून फिरकीपटू मोईन अली याने किफायतशीर गोलंदाजी करत चार षटकांत अवघ्या 21 धावा दिल्या. याशिवाय, अली याने दोन गडीही बाद केले. याशिवाय तायमल मिल्स (27 धावा - 1 बळी) व जॉर्डन (27 धावा - 1 बळी) यां मध्यमगती गोलंदाजांनीही भारतीय फलंदाजांना रोखून धरण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Web Title: England defeats India