निर्भय आणि बेधडक क्रिकेटची मालिका (सुनंदन लेले)

सुनंदन लेले
Tuesday, 3 July 2018

भारतीय संघाने चांगला सराव आणि दोन टी20 सामने आयर्लंडसमोर खेळून वातावरणाशी जुळवून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. सध्याच्या घडीला जबरदस्त आक्रमक लयीत खेळणाऱ्या इंग्लंड संघासमोर विराट कोहलीचा संघ टक्कर देणार आहे.

मॅंचेस्टर : इंग्लंडमधे क्रिकेट खेळताना फलंदाजाने चांगले दिसणे आणि त्याच्या तंत्रात शुद्धता दिसणे याला पूर्वीपासून फार महत्त्व आहे. उजव्या हाताने खेळणाऱ्या फलंदाजाचा कोणताही फटका मारताना डाव्या हाताचे कोपर वर जायला हवे मग जाणकार प्रेक्षक त्याला टाळ्या वाजवून पावती द्यायचे. झाले काय की याच चांगले दिसण्याच्या नादात इंग्लंडचे फलंदाज आपले लक्ष फक्त धावा काढण्यावर असायला हवे ही मोलाची गोष्टच विसरून गेले होते. अजूनही इंग्लंडच्या कसोटी संघातील ऍलिस्टर कुक किंवा ज्यो रूट हे फलंदाज त्याच विचारांनी खेळताना दिसतात. बदल झालाय तो मर्यादित षटकांच्या संघात खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये. 

जेसन रॉय, जॉनी बेअर्स्टो किंवा जोस बटलर सारख्या फलंदाजांचे तंत्र खराब नक्कीच नाहीये फक्त मैदानावर पाय ठेवल्यावर ते फलंदाजी करताना कसा दिसतो याकडे शून्य लक्ष देतात आणि गोलंदाजाने टाकलेला चेंडू प्रचंड ताकदीने कसा फटकावता येईल याचा विचार करतात. टी20 किंवा एक दिवसीय सामन्यात इंग्लंड संघाचा खेळ सरस व्हायला हाच बदल कारणीभूत ठरला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड 3 सामन्यांच्या टी20 मालिकेला त्यामुळेच मजा येणार आहे. दोन्ही संघातील खेळाडू सकारात्मक, निर्भय आणि बेधडक क्रिकेट खेळणार ज्याचा आनंद प्रेक्षक लुटणार आहेत. 

इंग्लंडला येऊन दहा दिवस झाले. भारतीय संघाने चांगला सराव आणि दोन टी20 सामने आयर्लंडसमोर खेळून वातावरणाशी जुळवून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. सध्याच्या घडीला जबरदस्त आक्रमक लयीत खेळणाऱ्या इंग्लंड संघासमोर विराट कोहलीचा संघ टक्कर देणार आहे. इंग्लंड संघाने गेल्या महिन्यात असे काही क्रिकेट खेळले की ऑस्ट्रेलियन संघाला एक दिवसीय मालिकेत 5-0 पराभवाचा झटका त्यांनी दिला आहे. जोस बटलर, जेसन रॉय आणि जॉनी बेअर्स्टो या तिघांनी बॅटने धुमाकूळ घातला. याच तिघांना रोखण्याचे आव्हान भारतीय गोलंदाजांना आहे. 

भारतीय संघ मधल्या फळीतील स्थिरता शोधतो आहे. लोकेश राहुलवर संघाचा विश्‍वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सुरेश रैना अत्यंत उपयुक्त खेळाडू असला तरी निव्वळ फलंदाज म्हणून लोकेश राहुलवर भरवसा ठेवला जाऊ शकतो. जसप्रीत बुमराला दुखापत झाल्याने भुवनेश्‍वर कुमारसोबत उमेश यादवला पसंती दिली जाईल. कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलची यशस्वी जोडी इंग्लंडमध्ये कशी कामगिरी करते हे बघणे मजेदार ठरणार आहे. 

मॅंचेस्टर शहरातील ऐतिहासिक ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर पहिला सामना रंगणार आहे. गेले काही दिवस मॅंचेस्टर शहरात कडकडीत ऊन पडते आहे. खेळपट्टी संपूर्ण सुकलेली असेल आणि फलंदाजीला पोषक असेल असे दिसते. 2011 साली भारत वि इंग्लंड दरम्यान याच मैदानावर टी20 सामना झाला होता ज्यात राहुल द्रविडने समित पटेलला लागोपाठ 3 षटकार मारून सगळ्यांना चकित केले होते. सामना कामाच्या दिवशी म्हणजे मंगळवारी होत असला तरी अनिवासी भारतीय प्रेक्षक सामन्याला गर्दी करतील असे समजते आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी लागणार ती म्हणजे स्थानिक वेळ 7 वाजता इंग्लंडच्या फुटबॉल संघाचा अत्यंत महत्त्वाचा सामना कोलंबिया विरुद्ध रंगणार आहे. साहजिकच इंग्लिश खेळप्रेमींचा पहिली पसंती फुटबॉल सामन्याला राहणार आहे. 

मोठी संधी आहे : विराट कोहली 
""इंग्लंड संघ ज्या तडफेने क्रिकेट खेळतो आहे ते बघता भारतीय संघाला त्यांना तोडीस तोड उत्तर देणे हे संकट नसून मोठी संधी आहे'', पहिल्या टी20 सामन्याअगोदर बोलताना विराट कोहली म्हणाला. ""आयपीएलमधे यंदाच्या मोसमात बरेच इंग्लंडचे खेळाडू खेळले. आम्हांला त्यांचा स्वभाव कळाला त्यांच्याशी मैत्री करता आली. जोस बटलर आयपीएलचाच आत्मविश्‍वास घेऊन जबरदस्त कामगिरी करतो आहे. मी एकच म्हणेन की चांगल्या संघासमोर चांगले क्रिकेट खेळले तरच निभाव लागणार आहे. आमची तयारी चांगली झाली आहे. हवा एकदम उत्तम आणि गरम आहे. गेल्या वेळेला जिंकलो असल्याने करंडक आमच्याकडे आहे म्हणजेच यजमान संघावर घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करायचे दडपण असेल. आम्ही एकदम बेधडक क्रिकेट खेळणार आहोत. पुढील वर्षीचा वर्ल्डकप दूर असला तरी त्याची काही तयारी होणार आहे...काही प्रश्‍नांची उत्तरे शोधायला मदत होणार आहे'', कोहलीने सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: England tour of India