इंग्लंडच्या विजयाने बांगलादेश उपांत्य फेरीत; ऑस्ट्रेलियाचे पॅकअप

वृत्तसंस्था
रविवार, 11 जून 2017

संक्षिप्त धावफलक -
ऑस्ट्रेलिया 50 षटकांत 9 बाद 277 (ट्राव्हिस हेड 71 -64 चेंडू, 5 चौकार, 2 षटकार, ऍरॉन फिंच 68 -64 चेंडू, 8 चौकार, स्टिव्ह स्मिथ 56 -77 चेंडू, 5 चौकार, मार्क वूड 4-33, अदिल रशिद 4-41) पराभूत वि. इंग्लंड 40.2 षटकांत 4 बाद 240 (बेन स्टोक्‍स नाबाद 102 -109 चेंडू, 13 चौकार, 2 षटकार, इयॉन मॉर्गन 87 -81 चेंडू, 8 चौकार, 5 षटकार, जोस बटलर नाबाद 29, जोश हेझलवूड 2-50). 

बर्मिंगहॅम - एकही पूर्ण सामना न खेळता शनिवारी ऑस्ट्रेलियाचे चॅंपियन्स करंडक स्पर्धेतील आव्हान आटोपले. ऑस्ट्रेलियाचा सलग तिसरा सामना पावसामुळे वाया गेला. अर्थात तिसऱ्या सामन्यात डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे इंग्लंडने विश्‍वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 40 धावांनी पराभव केला. 

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला धावगतीचा वेग राखण्यात अपयश आले. त्यामुळे त्यांना ऍरॉन फिंच, स्टिव्ह स्मिथ, ट्राविस हेड यांच्या अर्धशतकी खेळीनंतरही 50 षटकांत 9 बाद 277 धावांचीच मजल मारता आली. इंग्लंडने सुरवातीच्या धक्‍क्‍यानंतर इयॉन मॉर्गन आणि बेन स्टोक्‍सच्या नाबाद शतकी खेळीने धावगतीचे समीकरण साधत बाजी मारली. इंग्लंडच्या डावात दुसऱ्यांदा पावसाचा व्यत्यय आला तेव्हा सामना थांबविण्यात आला. तेव्हा 40.2 षटकांत 4 बाद 240 धावा करणारे इंग्लंड डकवर्थ लुईसच्या नियमानुसार 40 धावांनी पुढे होते. 

आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांनी धक्के देत 3 बाद 35 असे अडचणीत आणले होते. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययाने खेळ थांबला. पुन्हा खेळ सुरू झाल्यावर पावसाची पुन्हा शक्‍यता लक्षात घेऊन कर्णधार इयॉन मॉर्गन आणि बेन स्टोक्‍स यांनी आक्रमक फलंदाजी करत धावगतीचे समीकरण अचूक साधले. त्यांनी चौथ्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी केली. कर्णधार मॉर्गन 87 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर जोस बटलरने स्टोक्‍सला साथ देत धावगती कायम राखली. स्टोक्‍सने आपले शतक पूर्ण केले आणि लगेचच पावसाच्या दुसऱ्या व्यत्ययाने सामना थांबविण्यात आला. 

संक्षिप्त धावफलक -
ऑस्ट्रेलिया 50 षटकांत 9 बाद 277 (ट्राव्हिस हेड 71 -64 चेंडू, 5 चौकार, 2 षटकार, ऍरॉन फिंच 68 -64 चेंडू, 8 चौकार, स्टिव्ह स्मिथ 56 -77 चेंडू, 5 चौकार, मार्क वूड 4-33, अदिल रशिद 4-41) पराभूत वि. इंग्लंड 40.2 षटकांत 4 बाद 240 (बेन स्टोक्‍स नाबाद 102 -109 चेंडू, 13 चौकार, 2 षटकार, इयॉन मॉर्गन 87 -81 चेंडू, 8 चौकार, 5 षटकार, जोस बटलर नाबाद 29, जोश हेझलवूड 2-50). 

Web Title: England vs Australia, ICC Champions Trophy: England Beat Australia By 40 Runs