कुलदीपला खेळायचे कसे, फलंदाजांना रोखायचे कसे

Friday, 13 July 2018

पहिल्या एकदिवसीय सामन्यातील भल्यामोठ्या पराभवाने इंग्लंड संघ व्यवस्थापन हैराण झाले आहे. कार्डीफच्या एका सामन्याचा अपवाद वगळता झालेल्या ४ पैकी तीन सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. हे सर्व विजय प्रचंड मोठ्या फरकाचे होते. दरवेळी विजय संपादन करताना भारतीय संघाच्या खेळातील सहजता इंग्लंड प्रशिक्षकांना हैराण करून सोडत आहे. कुलदीपला खेळायचे कसे आणि भारतीय फलंदाजांना रोखायचे कसे हr समस्या त्यांना सतावत आहे. 

नॉटींगहॅम : पहिल्या एकदिवसीय सामन्यातील भल्यामोठ्या पराभवाने इंग्लंड संघ व्यवस्थापन हैराण झाले आहे. कार्डीफच्या एका सामन्याचा अपवाद वगळता झालेल्या ४ पैकी तीन सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. हे सर्व विजय प्रचंड मोठ्या फरकाचे होते. दरवेळी विजय संपादन करताना भारतीय संघाच्या खेळातील सहजता इंग्लंड प्रशिक्षकांना हैराण करून सोडत आहे. कुलदीपला खेळायचे कसे आणि भारतीय फलंदाजांना रोखायचे कसे हr समस्या त्यांना सतावत आहे. 

खेळात हारजीत असते हे मान्य केले जाते. परंतु पराभव जेव्हा असा होतो की संपूर्ण सामन्यात समोरच्या संघाचे वर्चस्व दिसते तेव्हा चिंता वाढते. इंग्लंड संघाचे तेच झाले आहे. नॉटींगहॅम सामन्यातील पराभव इंग्लंड संघाच्या मनावर तशीच जखम करून गेला आहे. ‘‘चांगल्या खेळपट्टीवर आम्ही विकेटस् गमावत राहिलो त्यामुळे ३०० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. कुलदीप यादव चांगला फिरकी गोलंदाज आहे. जर मी नको त्या वेळी बाद झालो नसतो तर त्याच्यावर आक्रमण करून दडपण वाढवता आले असते. हा भारतीय संघ ताकदवान आहे. सातत्याने चांगला खेळ करून त्यांना दडपणाखाली टाकण्यात यश आले तर आम्हांला मजल मारता येईल. दुसर्‍या सामन्यात खेळात सर्वांगीण सुधारणा करण्यावाचून आता पर्याय नाही’’, सामन्यानंतर इंग्लंडचा कप्तान इऑन मॉर्गनने सांगितले. 

सामनावीर कुलदीप यादव हसत हसत पत्रकारांना भेटला. ‘‘6 फलंदाजांना बाद करता आले याचा मला खूप आनंद झाला. तो एक विक्रम ठरला याचे आश्चर्य वाटले. मला वाटते चेंडू वळणे ही गोष्ट खेळपट्टीवर अवलंबून नसते तर फिरकी गोलंदाजाच्या मनात ती जिगर आणि बोटात ते कौशल्य हवे असते. मी लहानपणी सिमेंट विकेटवर गोलंदाजी केली आहे आणि प्रशिक्षकांनी मला त्या खेळपट्टीवरही चेंडू कसा वळू शकतो हे शिकवले आहे. खरे सांगायचे तर आम्ही मस्त क्रिकेट खेळत आहोत. रोहितने केलेली फलंदाजी दीर्घकाळ स्मरणात राहील’’, कुलदीप म्हणाला.

 पहिल्या आणि दुसर्‍या सामन्यात फक्त एका दिवसाची विश्रांती असल्याने भारतीय संघाने सराव न करता विश्रांती घेणे पसंत केले. लॉर्ड्स मैदानावर दुसरा सामना सुट्टीच्या दिवशी होणार असल्याने सर्व तिकिटे कधीच संपली आहेत. काळ्या बाजारातही तिकिटांना मोठी मागणी आहे. स्थानिकच काय भारतातून खूप प्रेक्षक हा सामना अनुभवायला लंडनला आले आहेत. भारतीय संघाला प्रचंड पाठिंबा प्रेक्षकांकडून मिळतो आहे त्याचा विचार करता दुसरा सामना जिंकून मालिकेवर शिक्का मारायचा प्रयत्न विराट कोहली आणि त्याचे सहकारी करतील असे वाटते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: England vs India One Day Series