विराटचा इंग्लंडला दुसरा पंच

विराट टॅटूधारी बाहू उंचावतो तेव्हा साऱ्यांनाच स्फूरण चढते. विराटने ही खेळी पत्नी अनुष्काला अर्पण केली. त्याने गळ्यातील सोनसाखळीतील वेडींग रिंग काढून तिचे किस घेतले. त्यानंतर त्याने मुठी आवळून नेहमीसारखा जल्लोष केला.

या फलंदाजाची क्षमताच मुळी अफाट
बॅट फिरताच चेंडू सीमापार होई सुसाट
भलेभले गोलंदाज होऊन जाती भुईसपाट
अनुष्काच्या आधीपासून तुमचा आमचा लाडका विराट

इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी प्रतिस्पर्धी कर्णधाराला शतक सोडाच नर्व्हस नाईंटीजमध्ये जाण्यापूर्वीच धावचीत केलेल्या विराट कोहलीने दुसऱ्या दिवशी आणखी एक पंच टाकला. संघातील सहकारी हजेरी लावून तंबूचा मार्ग धरत असताना विराटने आपली उपस्थिती जोरदार पद्धतीने जाणवून दिली. टॉप ऑर्डर, मिडील ऑर्डरची तुल्यबळ साथ अपेक्षित असताना त्याने टेल एन्डर्सना हाताशी धरून धिरोदात्त खेळी साकारली.

आकडेवारी हा क्रिकेटचा अविभाज्य भाग मानला जातो. त्यावरून प्रामुख्याने समालोचक आणि तज्ज्ञ मंडळीच उहापोह करतात असे नव्हे तर क्रिकेटप्रेमीसुद्धा एकमेकांना आकडे सांगत आपला मुद्दा छातीठोकपणे मांडत असतात.

विराटने एकूण 57वे आंतरराष्ट्रीय, 22 वे कसोटी, कर्णधार म्हणून 15वे आणि इंग्लंडमध्ये पहिलेच शतक ठोकले. याहीपेक्षा महत्त्वाची आकडेवारी म्हणजे विराटला 2014च्या इंग्लंड दौऱ्यात 10 डावांत मिळून अवघ्या 134 धावा करता आल्या होत्या. यावेळी विराटने पहिल्याच डावात 149 धावांची खेळी साकारली.

शूरांना नशीबाची साथ
जो निधड्या छातीने धडाडी दाखवितो त्याला नशीब साथ देते अशा आशयाची 'Fortune favours the brave' ही इंग्रजी उक्ती प्रसिद्ध आहे. विराटला दोन जिवदाने मिळाली. दोन्ही वेळा डेव्हीड मलान याने मेहेरनजर केली. 

मानसिक खच्चीकरण
अखेरचा फलंदाज उमेश यादव खेळायला आला तेव्हा विराट 97 धावांवर होता. त्याचे शतक पूर्ण होईल की नाही अशी चिंता चाहत्यांना वाटत होती, पण विराटने तब्बल 57 धावांची भागिदारी रचली. ज्यात उमेशचा वाटा एकाच धावेचा होता. बेन स्टोक्सला लेटकटचा चौकार मारत विराटने शतक पूर्ण केले. त्यावेळी क्रिकेटचा चेंडू त्याला फुटबॉलइतका दिसत होता. म्हणजे जम बसल्यामुळे त्याची नजर चेंडूवर स्थिरावली होती. त्याचा आत्मविश्वास या शॉटने दाखवून दिला. विराटने शतकानंतर उत्तम टोलेबाजी केली. आदिल रशीदला षटकार खेचत त्याने इंग्लंडचे मानसिक खच्चीकरण केले. वास्तविक अशा कसोटीत नाममात्र आघाडी सुद्धा उपयुक्त ठरत असते, पण विराटची खेळी इंग्लंडच्या बाजूचा हा कथित सरस मुद्दा झाकोळून टाकणारी ठरली.

शिस्तबद्ध फलंदाजी
भारतीय संघाचे बॅटींग कोच संजय बांगर यांनी विराटचे कौतुक केले. आक्रमणच नव्हे तर प्रतिआक्रमण हे सुत्र असलेल्या विराटच्या फलंदाजीतील शिस्तीचा मुद्दा त्यांनी ठळकपणे मांडला. दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, विराटचा खेळ अत्यंत शिस्तबद्ध होता. एकाही क्षणी त्याने स्वैर चेंडूचा पाठलाग केला नाही. सुमारे पाच तासांच्या खेळीत त्याने अशीच शिस्त दाखविताना आपली तंदुरुस्ती अधोरेखित केली.

सेलिब्रेशन
विराट हा आधुनिक क्रिकेटमधील आघाडीचा शोमॅन आहे. कारकिर्दीच्या प्रारंभापासून त्याचे सेलिब्रेशन वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. तसे पाहिले तर मुठी आवळून सगळेच जिगर व्यक्त करतात, पण विराट टॅटूधारी बाहू उंचावतो तेव्हा साऱ्यांनाच स्फूरण चढते. विराटने ही खेळी पत्नी अनुष्काला अर्पण केली. त्याने गळ्यातील सोनसाखळीतील वेडींग रिंग काढून तिचे किस घेतले. त्यानंतर त्याने मुठी आवळून नेहमीसारखा जल्लोष केला.

इंग्लंडमधील विराटच्या पहिल्या शतकाची प्रतिक्षा लांबली जरूर, पण हे त्याच्या सुरु झालेल्या मालिकेमधील शेवटचे शतक नक्कीच नाही. हाच संदेश विराटने इंग्लंडला दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: England vs India test series