भारतीय फलंदाजांची स्वींग गोलंदाजीसमोर शरणागती

वृत्तसंस्था
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

गुरुवारचा पहिला दिवस पावसाने धुतला गेल्यावर लॉर्डस कसोटी सामन्याला दुसर्‍या दिवशी एकदम वेळेवर सुरुवात झाली. ज्यो रूटने सलग दुसर्‍यांदा नाणेफेक जिंकली. फरक इतकाच होता की पहिल्या कसोटीत प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतलेल्या ज्यो रूटने लॉर्डस कसोटीत प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. दिवसभर लॉर्डस मैदानावर पावसाने आणि खेळ चालू असताना स्वींग गोलंदाजीने हजेरी लावली. अँडरसन - वोकस् जोडीने भारतीय फलंदाजांना आपल्या स्वींग गोलंदाजीच्या तालावर नाचवले. एकूण 35.2 षटकांच्या खेळात कर्णधाराचा गोलंदाजी करायचा निर्णय किती योग्य होता हे कळून चुकले. दुसर्‍या दिवशीचा खेळ थांबला असताना भारतीय संघाचा पहिला डाव 107 धावांमधे गुंडाळण्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना यश आले. 

लंडन : गुरुवारचा पहिला दिवस पावसाने धुतला गेल्यावर लॉर्डस कसोटी सामन्याला दुसर्‍या दिवशी एकदम वेळेवर सुरुवात झाली. ज्यो रूटने सलग दुसर्‍यांदा नाणेफेक जिंकली. फरक इतकाच होता की पहिल्या कसोटीत प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतलेल्या ज्यो रूटने लॉर्डस कसोटीत प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. दिवसभर लॉर्डस मैदानावर पावसाने आणि खेळ चालू असताना स्वींग गोलंदाजीने हजेरी लावली. अँडरसन - वोकस् जोडीने भारतीय फलंदाजांना आपल्या स्वींग गोलंदाजीच्या तालावर नाचवले. एकूण 35.2 षटकांच्या खेळात कर्णधाराचा गोलंदाजी करायचा निर्णय किती योग्य होता हे कळून चुकले. दुसर्‍या दिवशीचा खेळ थांबला असताना भारतीय संघाचा पहिला डाव 107 धावांमधे गुंडाळण्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना यश आले. 

खेळाला सुरुवातच भयानक झाली. अँडरसनचा सुरेख आउटस्वींग चेंडू मनगटे वळवून खेळायच्या प्रयत्नात एम विजयने आपली ऑफ स्टंप हलताना बघितली. दोन चौकार मारून उगाच आशा वाढवणारा लोकेश राहुल अँडरसनला झेलबाद झाला आणि त्यानंतर कडेलोट झाला जेव्हा चेतेश्वर पुजारा धावबाद झाला. अँडरसनचा चेंडू तटवल्यावर चोरटी धाव घेण्याच्या उद्देशाने विराट कोहली पुढे सरसावला तेव्हा पुजारा 100% तयारीत नव्हता. विराट धावताना बघून तो पळू लागला, पण प्रथम पुजाराने प्रतिसाद दिला नाही म्हणून विराट मागे फिरला. क्रिकेटच्या भाषेत आम्ही ज्याला भरतभेट म्हणतो म्हणजे दोनही फलंदाज एका बाजूला तसे बघायला मिळाले. ऑली पोपने चेंडू स्वत: जाऊन स्टंपवर लावला. 

त्यावेळी पाऊस पडू लागल्याने बीबीसीचा अवलिया आकडे तज्ज्ञ अँन्ड्र्यू सॅमसन माझ्या शेजारी आला आणि त्याने धावबाद होण्याची मजेदार आकडेवारी पटकन सांगितली. तो म्हणाला, ‘‘गेल्या 6 डावात पुजारा तिसर्‍यांदा धावबाद होत आहे. सर्वात मजा स्टीव्ह वॉची आहे कारण तो 27 वेळा फलंदाज धावबाद होताना सामील होता पण प्रत्यक्षात तो स्वत: फक्त 4 वेळा धावबाद झाला 23 वेळा समोरचा फलंदाज धावबाद झालाय. मायकेल वॉन आणि मार्कस ट्रीस्कोथिकचा विक्रम चांगला आहे. दोघे 70पेक्षा जास्त वेळा एकत्र फलंदाजी करून एकदाही एकमेकांसमोर धावबाद झाले नव्हते. पण एक सांगतो पुजाराच्या बाबतीत कोणी सामील नसते...तो स्वत:च धावबाद होतो’’, डोळे मिचकावत अ‍ॅन्ड्र्यू सॅमसन म्हणाला.

पावसाच्या व्यत्ययाने खेळ बर्‍याच वेळा बंद पडत होता. लॉर्डस कसोटी सामन्यात फक्त 35 मिनिटांचा खेळ झाला ज्यात भारतीय संघाने 3 फलंदाज गमावून 15 धावा जमा केल्या. चहापानाअगोदरच्या वेळेला खूपच जोरात पाऊस मैदानावर कोसळू लागला. लॉर्डस मैदानाचे पाणी निचरा होण्याची व्यवस्था उत्तम असून पाण्याची तळी दिसू लागली. प्रेक्षक पंच आणि खेळाडूंनी काळ्या ढगांनी व्यापलेल्या आकाशाकडे बघत हताश होऊन हातात चहाचे वाफाळते कप घेतले.

चहापानानंतर खेळ चालू झाला हा चमत्कार वाटला इतका पाऊस मैदानाने आपल्या पोटात पचवला होता. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने फलंदाजी करताना सतत चकत असून काही काळ तग धरला. ख्रीस वोकस्ने कोहलीला अफलातून आऊट स्वींग चेंडू टाकून सतावले. कोहली - रहाणेचे झेल गेले. वोकस्ने कोहलीला बाद केले आणि लगेच हार्दिक पंड्या बरोबर दिनेश कार्तिकला बोल्ड केले. अँडरसनने रहाणेचा प्रतिकार संपवला. अश्विनने 29 धावा करून किल्ला थोडा लढवल्यामुळे भारतीय संघाने कशीतरी शंभर धावांची मजल पार केली. अँडरसनने 20 धावांमधे 5 आणि वोकस्ने 3 फलंदाजांना बाद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: England vs India test series