इंग्लंडसमोर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचे कडवे आव्हान 

सुनंदन लेले 
Friday, 6 July 2018

भारताविरुद्धच्या मालिकेची सुरवात पराभवाने झाल्यामुळे इंग्लंडसमोर दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात कडवे आव्हान आहे. ही लढत शुक्रवारी होत आहे. 

कार्डिफ - भारताविरुद्धच्या मालिकेची सुरवात पराभवाने झाल्यामुळे इंग्लंडसमोर दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात कडवे आव्हान आहे. ही लढत शुक्रवारी होत आहे. 

मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावरील पराभवाने इंग्लंड संघ विचारमग्न झाला आहे. अगदी नजीकच्या भूतकाळात याच इंग्लिश संघाने ऑस्ट्रेलियन संघाला सपाटून पराभूत केले होते. भारतासमोरच्या मालिकेत या विजयाच्या लयीत इंग्लंडचा संघ जोमाने उतरला होता. जून महिन्यात एकापाठोपाठ मिळवलेल्या यशाची सर्व नशा भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात खाडकन उतरवली. फलंदाजी आणि गोलंदाजीत स्पष्ट वरचढ खेळ भारतीय संघाने सहजी करून दाखवल्याने इंग्लंड संघ व्यवस्थापन विचारात गढून गेले आहे की, भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यात पराभूत करून तीन सामन्यांची मालिका जिवंत कशी ठेवायची. 

कर्णधार इयॉन मॉर्गनला दोन फिरकी गोलंदाजांना कसे खेळायचे याचे उत्तर शोधायचे आहे. ""होय युजवेंद्र चहल चांगला गोलंदाज आहे, पण त्याला खेळणे अशक्‍य नाही. कुलदीप यादव संपूर्णपणे वेगळा गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीत वेगळा वेग आहे, ज्याचा त्याचा तो हुशारीने वापर करतो आणि सतत फलंदाजाला बाद करायचा विचार करतो. तसा गोलंदाज इंग्लंड क्रिकेटमध्ये नसल्याने सराव करणे अशक्‍य आहे. म्हणूनच कुलदीपला रोखणे हे मोठे आव्हान आहे,'' असे मॉर्गनने कबूल केले. 

"पहिल्या सामन्यात सर्वकाही मनासारखे घडले. कुलदीपची गोलंदाजी आणि राहुलच्या फलंदाजीचा आम्ही सगळ्यांनी आनंद लुटला. कल्पना आहे की इंग्लंडचा संघ जोरदार पुनरागमन करू शकतो. ती ताकद त्यांच्या संघात आहे. आम्हाला एका विजयाने हुरळून जायची काहीच गरज नाहीये. एकच आहे की जर कार्डीफचा सामना जिंकला तर टी-20 मालिका जिंकण्याची मजा लुटता येईल. अर्थातच दडपण यजमान संघावर आहे,'' असे भारतीय कर्णधार विराट कोहली कार्डीफच्या मैदानावर सरावाअगोदर भेटला तेव्हा डोळे मिचकावत म्हणाला. 

दोन्ही संघांत मोठे बदल होण्याची शक्‍यता कमी वाटते आहे. मॅंचेस्टरच्या तुलनेत कार्डीफला हवा गार आहे. आकाशात ढग आहेत. इंग्लंड संघ दुसऱ्या सामन्याकरिता खेळपट्टी एकदम कोरडी करू नका, असा संदेश "क्‍युरेटर'ला देत असणार. कोरड्या खेळपट्टीचा फायदा भारतीय फिरकी गोलंदाजांना कसा होतो हे पहिल्या सामन्यात दिसून आल्याने दुसऱ्या सामन्याची खेळपट्टी थोडी गवत असलेली राखली जायची शक्‍यता नाकारता येत नाही. कार्डीफला भारतीय संघ हाच एकमेव सामना खेळणार असल्याने प्रेक्षक गर्दी करतील, असा विश्‍वास संयोजकांना आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: england vs inida 2nd T20 cricket match