इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाला 140 वर्षांनंतर व्हाईटवॉश

वृत्तसंस्था
Monday, 25 June 2018

जॉस बटलरच्या जिगरबाज शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा अखेरच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात पराभव करत एकदिवसीय मालिकेत तब्बल 140 वर्षांनी व्हाईटवॉश दिला. इंग्लंडने अखेरच्या सामन्याच ऑस्ट्रेलियाचा एक गडी राखून पराभव केला.

मॅनचेस्टरः जॉस बटलरच्या जिगरबाज शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा अखेरच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात पराभव करत एकदिवसीय मालिकेत तब्बल 140 वर्षांनी व्हाईटवॉश दिला. इंग्लंडने अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा एक गडी राखून पराभव केला.

प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा फिरकी गोलंदाज मोईन अली समोर जणू शरणागती पत्करली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 34.4 षटकांमध्ये फक्त 205 धावा करता आल्या. कमी वाटणाऱ्या या धावांचा पाठलाग करताना मात्र इंग्लंडची 114-8 अशी बिकट परिस्थिती झाली होती. त्यावेळी बटलर आणि आदिल रशीद यांनी आठव्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी करत नऊ चेंडू राखून इंग्लंडला विजय मिळवून दिला.

इंग्लंडने या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियावर पूर्णपणे वर्चस्व गाजविले. इंग्लंडने तिसऱ्या सामन्यात सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम केला, तर चौथ्या सामन्यात पाच षटके राखत 300हून अधिक धावांचा पाठलाग केला. इंग्लंडचे प्रतिस्पर्धी संघाला दुसऱ्यांदा पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत व्हाईटवॉश देण्याचे स्वप्न अपूरे राहणार असे वाटत असतानाच जॉस बटलरने आदिल रशीदच्या साथीत इंग्लंडचे स्वप्न सत्यात उतरविले. 

''आजचा दिवस अतिशय संमोहित करणारा होता. जॉसने अप्रतिम खेळ केला. ड्रेसिंग रुममध्ये सर्वांना त्याचा प्रचंड अभिमान वाटत होता. आम्ही आज चांगला खेळ करु शकलो नाही मात्र जॉसने आमच्यासाठी विजय खेचून आणला'' या शब्दात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने जॉस बटलरचे कौतुक केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: England white washed Australia after 140 years