esakal | इंग्लंडला हजाराव्या कसोटी सामन्याचे आव्हान 
sakal

बोलून बातमी शोधा

England's challenge for the one thousand Test match

इंग्लंडला हजाराव्या कसोटी सामन्याचे आव्हान 

sakal_logo
By
सुनंदन लेले

बर्मिंगहॅम : यजमान इंग्लंड संघाच्या ऐतिहासिक एक हजाराव्या कसोटीची पार्श्‍वभूमी असलेल्या सामन्यात उद्या बुधवारपासून येथील एजबस्टनच्या मैदानवार सुरवात होत आहे. एक हजारावा सामना आणि इतिहास इंग्लंडच्या बाजूने असला तरी सध्याच्या भारतीय संघाला कमी लेखण्याची चूक त्यांच्याकडून होणार नाही. भारतीय संघदेखील जय्यत तयारी करून इंग्लंडला आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. मायदेशात इंग्लंड संघाला आव्हान निर्माण करायचे असेल, तर तीनही आघाड्यांवर भारताला वरचढ खेळ करावा लागणार आहे. अर्थात, आव्हान आणि प्रतिआव्हानाची लढाई लढताना येथील लहरी हवामानाचा अंदाज रुट आणि कोहली या प्रतिस्पर्धी कर्णधारांना घ्यावा लागणार आहे. संघ निवडीसाठी तो आवश्‍यक असेल. 

पाच सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला सामना असल्याने चांगल्या सुरवातीसाठी दोन्ही संघ उत्सुक असतील. येथील हवामान अचानक बदलल्यामुळे हवामान आणि खेळपट्टीचे स्वरूप लक्षात घेत नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरेल, यात शंका नाही. अशा वेळी भारतीय संघासमोर संघ निवडीचा प्रश्‍न बिकट असेल. गोलंदाजांच्या निवडीपेक्षा फलंदाजीची क्रमवारी ठरवणे कोहलीसाठी डोकेदुखी ठरेल. सराव सामन्यात शिखर धवनला अपयश आल्यामुळे लोकेश राहुलचे पारडे जड आहे. चेतेश्‍वर पुजारा अपयशी ठरला असला तरी, त्याला वगळण्याचा धोका सध्या तरी भारतीय संघ व्यवस्थापन घेणार नाही. 

गोलंदाजीत एजबस्टन मैदानावरील खेळपट्टीचा चेहरा बघता तीन वेगवान गोलंदाज संघात ठेवले जातील, असा अंदाज लागतोय. म्हणजेच ईशांत शर्मा, मोहंमद शमी आणि उमेश यादव तिघेही खेळतील. फिरकी गोलंदाजाची चर्चा या सामन्यापुरती अश्‍विनभोवतीच थांबेल असेच चित्र आहे. 

दुसरीकडे इंग्लंड संघ कुलदीपला संधी मिळणार, असे गृहीत धरून तयारी करत आहे. एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील अनुभव लक्षात घेऊन इंग्लंडनेही आदिल रशिदची आश्‍चर्यकारक निवड केली. सहाजिकच मोईन अलीच्या जागी त्याची निवड निश्‍चित मानली जात असून, वेगवान गोलंदाजीसाठी जेमी पोर्टरला पदार्पणाची संधी देताना अँडरसन, ब्रॉड, क्‍युरन अशी चौकडी इंग्लंड बाळगण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

loading image