अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून सामना अनिर्णित

पीटीआय
बुधवार, 22 जून 2016

नॉटिंगहॅम - इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू लियम प्लंकेटने अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून श्रीलंकेविरुद्धचा एकदिवसीय सामना अनिर्णित राखण्यात यश मिळविले.

नॉटिंगहॅम - इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू लियम प्लंकेटने अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून श्रीलंकेविरुद्धचा एकदिवसीय सामना अनिर्णित राखण्यात यश मिळविले.

इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम श्रीलंकेला फलंदाजीला पाचारण केले. श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज (73) आणि सिक्कुगे प्रसन्ना (59) यांच्या अर्धशतकी खेळामुळे श्रीलंकेने इंग्लंडसमोर 287 धावांचे आव्हान ठेवले. इंग्लंडकडून ख्रिस वोक्स, डेव्हिड व्हिली आणि प्लंकेटने प्रत्येकी दोन बळी घेतले. मॅथ्यूजने 109 चेंडूत केलेली 73 धावांची खेळीच श्रीलंकेची सर्वोत्तम खेळी ठरली. प्रसन्नाने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत केवळ 28 चेंडूत 59 धावा केल्या. त्याने आठ चौकार व चार षटकार खेचले. 

या आव्हानापुढे इंग्लंडची सुरवात खराब झाली. फलकावर अवघ्या तीन धावा असताना जेसन रॉय पायचीत बाद झाला. त्यानंतर ऍलेक्स हेल्सही 7 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. इंग्लंडचे चार बळी अवघ्या 30 धावांतच बाद झाले. कर्णधार मॉर्गनने 43 धावांची खेळी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. अखेर यष्टीरक्षक बटलर (93) आणि वोक्स (95) धावांची खेळी करत संघाला विजयाकडे नेले. अखेरच्या षटकामध्ये नुआन प्रदीपच्या शेवटच्या चेंडूवर प्लंकेटने षटकार खेचून श्रीलंकेच्या विजयाच्या आशेवर पाणी फेरले. प्लंकेटने 11 चेंडूत 22 धावांची खेळी केली.

Web Title: England's Liam Plunkett hist last ball six against Sri Lanka