फ्रॅंचायजी क्रिकेटची वस्तुस्थिती समजते

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 April 2018

पुणे - फ्रॅंचायजी क्रिकेटची वस्तुस्थिती मला समजते. माझी निवड न करण्यात राजस्थानची काही कारणे असतील, जी मी समजू शकतो. शेवटी त्यांच्यासाठी हा व्यवसाय असतो, अशी प्रतिक्रिया चेन्नईचा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू शेन वॉटसन याने व्यक्त केली.

पुणे - फ्रॅंचायजी क्रिकेटची वस्तुस्थिती मला समजते. माझी निवड न करण्यात राजस्थानची काही कारणे असतील, जी मी समजू शकतो. शेवटी त्यांच्यासाठी हा व्यवसाय असतो, अशी प्रतिक्रिया चेन्नईचा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू शेन वॉटसन याने व्यक्त केली.

पुण्यात शुक्रवारी राजस्थानविरुद्ध घणाघाती शतकी खेळीनंतर पत्रकार परिषदेत तो पुढे म्हणाला की, मुळात २००८ मध्ये राजस्थानकडून संधी मिळाल्याबद्दल मी ऋणी आहे. तेव्हा दुखापतींमुळे मला आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळविण्यासाठी झगडावे लागत होते. नंतर मला बंगळूरने संधी दिली आणि हेसुद्धा माझे सुदैव ठरले. आता चेन्नईबरोबर माझी वाटचाल सुरू झाली आहे. चेन्नई ही फार ‘ग्रेट’ फ्रॅंचायजी आहे. संघ म्हणून चेन्नई संघातील समन्वयाचे मला नेहमीच कौतुक वाटायचे. दडपणाच्या स्थितीत ते नेहमीच चांगले खेळायचे. अशा संघात सहभागी होणे खरेच ‘स्पेशल’ आहे. महेंद्रसिंह धोनीची नेतृत्वशैली कशी आहे आणि स्टिफन फ्लेमिंगची त्यास कशी साथ मिळते हे मी जवळून पाहू शकतो.

आयपीएल ही तरुण खेळाडूंची स्पर्धा आहे. अशावेळी वयाच्या ३७व्या वर्षी वॉटसनची कामगिरी थक्क करणारी आहे, कारण तो वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू आहे. याविषयी तो म्हणाला की, तुम्हाला जे करायचे आहे त्याची शरीराला सवय होते. मला बऱ्याच दुखापती झाल्या. त्यामुळे सराव किंवा सामन्याआधी तंदुरुस्तीसाठी शरीराची काळजी घेण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. तंदुरुस्त असेपर्यंत वेगवेगळ्या स्पर्धांत फलंदाजी आणि गोलंदाजी करण्याची संधी मला आवडते.

कारकिर्दीच्या या टप्प्यास काढलेले शतक वॉटसनला सुखद वाटते. त्याने सांगितले की, बंगळूरकडून मागील दोन वर्षे सर्वोत्तम कामगिरी होऊ शकली नाही. मी वेगवेगळ्या गोष्टींवर प्रयत्न करीत होतो. अशाच इनिंगचे स्वप्न मी बघत होतो. कारकीर्द भरात असताना व्हायची तशी कामगिरी झाल्याचा आनंद वाटतो.

चेन्नईचे चाहते भारी
चेन्नईच्या चाहत्यांचा वॉटसनने आवर्जून उल्लेख केला. तो म्हणाला की, मुंबईत निम्मे स्टेडियम पिवळ्या रंगाने रंगले होते. चेन्नईतील पहिल्या सामन्याच्या वेळी काही स्टॅंड रिकामी ठेवणे भाग पडूनही वातावरण भारलेले होते. काही कारणांमुळे आम्हाला चेन्नई सोडावे लागले, पण पुण्यातील मैदान सज्ज करण्यासाठी अथक प्रयत्न केलेल्यांनी ‘होम ग्राउंड’चे वातावरण निर्माण केले. येथेही आमचे चाहते भरपूर होते. मला याचे आश्‍चर्य वाटत नाही, कारण आमचे चाहते निष्ठावान आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fact of franchise cricket