महासंघात राजकीय व्यक्तींना विरोध चुकीचा - विजय गोयल 

पीटीआय
बुधवार, 19 एप्रिल 2017

क्रीडा महासंघांची स्वायत्ततेचा आम्ही आदर करतो; पण त्यांच्या कामातही पारदर्शीपणा असायला हवा. आरोपपत्रातील दोन व्यक्तींच्या ‘आयओए’वरील नियुक्तीला त्यामुळेच आम्ही आक्षेप घेतला आणि  निलंबनाची कारवाई केली.
- विजय गोयल, केंद्रीय क्रीडामंत्री

नवी दिल्ली - राष्ट्रीय क्रीडा महासंघात राजकीय व्यक्ती असण्यास माझा विरोध नाही, असे सांगतानाच क्रीडा महासंघाचे कामकाज केवळ क्रीडापटू करू शकणार नाहीत, असे मत केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी व्यक्त केले. क्रीडा प्रसार विधेयक या वेळी पावसाळी अधिवेशनात लोकसभेत मांडले जाईल, अशी माहितीही गोयल यांनी या वेळी दिली. 

लोढा समितीने मंत्री किंवा सरकारी अधिकारी भारतीय मंडळाच्या कार्यकारिणीत नसावेत, असे मत व्यक्त केले आहे. याचीच अंमलबजावणी अन्य खेळांच्या संघटनेत करण्यात यावी, असेही मत व्यक्त होत आहे. यासंदर्भात गोयल म्हणाले की, क्रीडा प्रशासनास मंत्री वेळ देऊ शकणार असतील, तर त्यांच्या सहभागास विरोध करणे चुकीचे आहे. क्रीडा महासंघाचा कारभार केवळ खेळाडू पाहू शकणार नाहीत. क्रीडा महासंघात प्रशासन, जनसंपर्क यांसारख्या अनेक गोष्टी असतात. त्यासाठी खेळाडूंव्यतिरिक्त अन्य व्यक्तींची आवश्‍यकता असते. महासंघात असणाऱ्या व्यक्तींचे चारित्र्य चांगले असणे जास्त महत्त्वाचे आहे. क्रीडा संघटनांतील व्यक्ती नोकरशाह आहे की नाही, हे मी बघणार नाही. मंत्र्यांना पुरेसा वेळ देता येणार नाही; मात्र राजकीय व्यक्ती असूच नयेत हे मला मान्य नाही.

क्रीडा क्षेत्राचा विचार येतो तेव्हा सरकारला डावलून चालत नाही, असेही गोयल यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘प्रत्येक वेळेसच सरकारला डावलून चालत नाही. जेव्हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील लढतींचा प्रश्‍न येतो तेव्हा सरकारलाच निर्णय घ्यावा लागतो.’’

क्रीडा विधेयक पावसाळी अधिवेशनात
क्रीडा विधेयक पावसाळी अधिवेशनात लोकसभेत मांडण्यात येईल, असेही गोयल यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘क्रीडा संघटनांना काही मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करावा लागेल. याचा अवलंब न करणाऱ्या क्रीडा संघटनांना सरकारकडून मदत मिळणार नाही.’’ 

या विधेयकाच्या दुरुस्तीसाठी नऊ सदस्यीय समितीची नियुक्ती जानेवारीत झाली आहे. तिचे काम अंतिम टप्प्यात असून, ते लवकरच अहवाल सादर करतील, अशी चर्चा आहे. याबाबत गोयल म्हणाले, ‘‘क्रीडा संघटना त्या खेळाच्या आधारस्तंभ आहेत. त्यांची जबाबदारी निश्‍चित करण्यासाठीच आम्ही समितीची नियुक्ती केली.’’

आचारसंहितेतील संभाव्य मुद्दे
 महासंघातील पदाधिकाऱ्यांसाठी वयाची अट
 पदाधिकाऱ्यांची काल आणि कार्यनिश्‍चिती
 महासंघाच्या निवडणुकीत पात्र मतदारांची निश्‍चिती
 सर्व संघटनांत ‘एक राज्य एक मत’ हीच पद्धती असावी

Web Title: Federation political opposition wrong persons