पुढील वर्षी ऍशेसमध्ये होणार "डे-नाईट' कसोटी

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

ऍडलेड येथे होणाऱ्या डे-नाईट कसोटी सामन्यास प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळेल, असा आशावाद क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलॅंड यांनी व्यक्‍त केला आहे. ऍशेसनंतर, याच पाच शहरांमध्ये इंग्लंड व ऑस्ट्रेलियादरम्यान पाच एकदिवसीय सामन्यांची मालिकाही होणार आहे

सिडनी - क्रिकेट विश्‍वामधील पहिलीवाहिला दिवसरात्र (डे-नाईट) कसोटी सामना ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यामध्ये होणार आहे.

पुढील वर्षी आयोजित करण्यात आलेल्या "ऍशेस' कसोटी सामन्यांच्या मालिकेमधील ऍडलेड येथील सामना डे-नाईट असणार आहे. ऍडलेड येथील हा सामना 2 ते 6 डिसेंबर रोजी खेळविला जाणार असून ऍशेस मालिकेमधील हा दुसरा सामना आहे. या सामन्यासाठी अर्थातच गुलाबी चेंडू वापरण्यात येईल. ब्रिस्बेन येथे 23 ते 27 नोव्हेंबर रोजी खेळविल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याने ऍशेसचा प्रारंभ होणार आहे.

ऍशेसमधील तिसरा सामना पर्थ येथे आयोजित करण्यात आला आहे. 14 ते 18 डिसेंबर रोजी खेळविला जाणारा हा सामना येथील नव्या मैदानावर होण्याची शक्‍यता आहे. या नव्या मैदानाचे काम अद्यापी सुरु आहे. हे काम वेळेत पूर्ण न झाल्यास पर्थच्या जुन्या मैदानावरच हा सामना खेळविण्यात येईल. ऍशेसमधील उर्वरित दोन कसोटी सामने मेलबर्न आणि सिडनी येथे होणार आहेत. मेलबर्न येथील सामन्यास पारंपारिक बॉक्‍सिंग डेला डिसेंबर) प्रारंभ होईल; तर सिडनी येथील सामना 4 ते 8 जानेवारीदरम्यान होईल.

ऍशेसनंतर, याच पाच शहरांमध्ये इंग्लंड व ऑस्ट्रेलियादरम्यान पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. याशिवाय, फेब्रुवारी महिन्यामध्ये इंग्लंड व ऑस्ट्रेलियासहित न्यूझीलंडचाही समावेश असलेली ट्‌वेंटी-ट्‌वेंटी सामन्यांची मालिका होणार असून; या मालिकेचे आयोजन ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडकडून संयुक्‍तरित्या करण्यात आले आहे.

ऍडलेड येथे होणाऱ्या डे-नाईट कसोटी सामन्यास प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळेल, असा आशावाद क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलॅंड यांनी व्यक्‍त केला आहे.

Web Title: First day-night Ashes Test set for Adelaide