भारतीय महिलांनी इतिहास घडवला 

वृत्तसंस्था
Tuesday, 26 February 2019

ज्या इंग्लंड संघाकडून विश्‍वकरंडक हातचा निसटला होता, त्याच संघाचा सलग दोन सामन्यांत पराभव करून भारतीय महिलांनी त्यांच्याविरुद्ध प्रथमच एकदिवसीय मालिका जिंकण्याचा इतिहास घडवला. तीन दिवसांत दोन विजय मिळवले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. झूलन आणि शिखा या वेगवान गोलंदाजांचे यश; तसेच स्मृती मानधनाचे आणखी एक अर्धशतक भारताच्या यशाचे पैलू ठरले.

मुंबई ः ज्या इंग्लंड संघाकडून विश्‍वकरंडक हातचा निसटला होता, त्याच संघाचा सलग दोन सामन्यांत पराभव करून भारतीय महिलांनी त्यांच्याविरुद्ध प्रथमच एकदिवसीय मालिका जिंकण्याचा इतिहास घडवला. तीन दिवसांत दोन विजय मिळवले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. झूलन आणि शिखा या वेगवान गोलंदाजांचे यश; तसेच स्मृती मानधनाचे आणखी एक अर्धशतक भारताच्या यशाचे पैलू ठरले.

वानखेडे स्टेडियमवरील या सामन्यात प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या इंग्लंडला 161 धावांत गुंडाळल्यानंतर भारताने हे माफक आव्हान 41 षटकांतच पार केले. झूलन गोस्वामी आणि शिखा पांडे या वेगवान जोडीने प्रथमच प्रत्येकी चार विकेट मिळवण्याची किमया केली. त्यानंतर स्मृती मानधनाने 63 धावांची खेळी केली. कर्णधार मिताली राज हिनेही नाबाद 47 धावांचे योगदान दिले. 

वानखेडेच्या खेळपट्टीवर हिरवे गवत असतानाही इंग्लंडने प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचे धैर्य दाखवले खरे; पण ते प्रत्यक्षात उतरवता आले नाही. झूलन आणि शिखा यांनी कर्णधार हेथर नाईच, अनुभवी सारा टेलर आणि सलामीवीर ऍमी जोन्स यांना परत धाडले तेव्हा इंग्लंडची 3 बाद 14 अशी अवस्था झाली होती. दुसरी सलामीवीर ब्युमॉंट बाद झाली तेव्हा अवघ्या 44 धावा झाल्या होत्या. 

इंग्लंडची पडझड नाताली स्किवरने रोखण्याचा प्रयत्न करताना एका बाजूने नांगर टाकला. 85 धावांची खणखणीत खेळी केली; परंतु फॉर्मात आलेल्या भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या बाजूने हल्ला कायम ठेवला. त्यामुळे इंग्लंडने पुढचे पाच फलंदाज 26 धावांत गमावले. पहिल्या सामन्यातही त्यांचे अखेरचे सात फलंदाज 25 धावांत बाद करून भारतीयांनी विजय मिळवला होता. आजही या पडझडीमुळे इंग्लंडला दीडशे धावांचाही टप्पा कठीण होते; पण स्किवरने अखेरच्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. यात अलेक्‍स हार्टली या अखेरच्या फलंदाजाला भोपळाही फोडता आला नाही. 

आज भारताची सुरवात चांगली नव्हती. स्मृतीबरोबर फॉर्मात असलेली जेमिमी रॉड्रिग्ज शून्यावर बाद झाली, त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर खेळण्याची संधी मिळालेल्या पूनम राऊतने 32 धावांचे योगदान दिले; परंतु त्यासाठी तिने 65 चेंडू घेतले. मात्र दुसऱ्या बाजूने स्मृतीची बॅट चमकत असल्यामुळे दडपण आले नाही. तिने मितालीसह 66 धावांची भागीदारी करून विजय निश्‍चित केला. 

संक्षिप्त धावफलक ः इंग्लंड ः 43.3 षटकांत सर्व बाद 161 (नाताली स्किवर 85, लौरेन विनफिल्ड 28, झूलन गोस्वामी 4-30, शिखा पांडे 4-18, पूनम यादव 2-28) पराभूत वि. भारत ः 41.1 षटकांत 3 बाद 162 (स्मृती मानधना 63 -74 चेंडू, 7 चौकार, 1 षटकार, मिताली राज नाबाद 47 -69 चेंडू 8 चौकार, श्रुबसोल 2-23). 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first time in the home country Indian Women won the one day series