नेटमधील सरावासाठी ढाक्‍यात पाच नवोदित गोलंदाज दाखल 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 16 सप्टेंबर 2018

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी फलंदाजांना दर्जेदार सराव मिळावा म्हणून "बीसीसीआय'ने "अ' संघातील पाच गोलंदाजांना धाडले आहे. मध्य प्रदेशचा आवेश खान, कर्नाटकचा एम. प्रसिध कृष्णा, पंजाबचा सिद्धार्थ कौल असे तीन वेगवान गोलंदाज, डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाझ नदीम, लेगस्पिनर मयांक मार्कंडे पुढील तीन दिवस नेटमध्ये मारा करतील.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी फलंदाजांना दर्जेदार सराव मिळावा म्हणून "बीसीसीआय'ने "अ' संघातील पाच गोलंदाजांना धाडले आहे. मध्य प्रदेशचा आवेश खान, कर्नाटकचा एम. प्रसिध कृष्णा, पंजाबचा सिद्धार्थ कौल असे तीन वेगवान गोलंदाज, डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाझ नदीम, लेगस्पिनर मयांक मार्कंडे पुढील तीन दिवस नेटमध्ये मारा करतील.

आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यातील झटपट सामन्यांसाठी कौल याच कारणासाठी संघाबरोबर होता. आवेशचा अपवाद सोडल्यास इतर चौघे चौरंगी स्पर्धेत "अ' व "ब' संघाकडून खेळले. यात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेचाही सहभाग होता. 19 तारखेपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे करंडक स्पर्धेपर्यंत पाचही जण मायदेशी परततील. एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले, "स्पर्धेतील सामने लागोपाठ सामने होणार आहेत. त्यामुळे भुवनेश्‍वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांनी नेटमध्ये पूर्ण ताकदीनिशी मारा करण्याची अपेक्षा बाळगता येणार नाही.

स्थानिक गोलंदाजांमुळे दर्जेदार सराव मिळू शकत नाही. ही वरिष्ठ संघासाठी समस्या ठरते. त्यामुळे हे धोरण आखण्यात आले, जे संघाप्रमाणेच नवोदितांनाही उपयुक्त ठरेल. त्यामुळे प्रशिक्षकही प्रतिभावान खेळाडूंवर लक्ष ठेवू शकतात.' यापूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही आवेश, बसील थम्पी यांना पाठविण्यात आले होते. 

डावखुरा "थ्रोडाऊन स्पेशालिस्ट' 
आशिया करंडक स्पर्धेत पाकिस्तान मुख्य प्रतिस्पर्धी असेल. डावखुरा वेगवान गोलंदाज महंमद आमीर याचा समर्थपणे सामना करवा यावा म्हणून श्रीलंकेच्या नुवान सेनेवीरत्ने या डावखुऱ्या "थ्रोडाऊन स्पेशालिस्ट'ला पाचारण केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five new bowlers enter in Dhaka for net Practice