श्रीनिंना न्यायालयाचा पुन्हा दणका

पीटीआय
मंगळवार, 18 एप्रिल 2017

नवी दिल्ली - आयसीसीच्या बैठकीला उपस्थित राहून भारतीय क्रिकेटच्या प्रशासनात परतण्याचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा हाणून पाडले. व्यावसायिक हितसंबंधांच्या मुद्द्यावरून तुम्हाला दोषी ठरवलेले आहे. त्यामुळे तुम्ही आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करू शकत नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला.

पुढील आठवड्यात आयसीसीची बैठक होत आहे. प्रशासकीय समिती सध्या बीसीसीआयचे प्रशासन चालवत असल्यामुळे या बैठकीत कोणी बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करायचे, हा प्रश्‍न उपस्थित राहिला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यासह सध्या सचिवपदाचा कारभार सांभाळत असलेले अमिताभ चौधरी हे २४ एप्रिलला होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयकडून उपस्थित राहतील, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.

सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन यांना याअगोदर व्यावसायिक हितसंबंधांवरून दोषी ठरवलेले असल्यामुळे त्यांनी बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. या खंडपीठामध्ये न्या. अजय खानविलकर आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांचा समावेश आहे.

श्रीनिवासन यांनी आयसीसीआयच्या बैठकीला उपस्थित राहण्याची मोर्चेबांधणी सुरू केल्यानंतर प्रशासन समितीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय किंवा संलग्न राज्य संघटनांचा कोणताही पदाधिकारी ज्याला सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवले आहे, ती व्यक्ती बीसीसीआयचे कोणत्याही मार्गाने प्रतिनिधित्व करू शकत नाही, असा निकाल दिला. 

Web Title: Former president N. Srinivasan forced to make the Supreme Court again