गौतम गंभीरला डच्चू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

मुंबई - बदली खेळाडू म्हणून पुनरागमन करण्याची संधी मिळालेल्या गौतम गंभीरला अखेर संघातून वगळण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ निवडण्यात आला. तदुरुस्त झालेल्या भुवनेश्‍वर कुमारला पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे.

मुंबई - बदली खेळाडू म्हणून पुनरागमन करण्याची संधी मिळालेल्या गौतम गंभीरला अखेर संघातून वगळण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ निवडण्यात आला. तदुरुस्त झालेल्या भुवनेश्‍वर कुमारला पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात के. एल. राहुल जखमी झाल्यामुळे त्या मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी गौतम गंभीरला पाचारण करण्यात आले होते. आता राहुल तंदुरुस्त झाला आणि इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही खेळल्यामुळे त्याचे स्थान पक्के करण्यात आले असून, गंभीरला संघातून वगळण्यात आले.
गेल्या रणजी मोसमातील चांगल्या कामगिरीमुळे गंभीर पुन्हा चर्चेत आला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत २९ आणि ५०; तर इंग्लंडविरुद्ध राजकोट येथील सामन्यात २९ आणि शून्य धावा गंभीरला करता आल्या होत्या. याच मालिकेतील विशाखापट्टण येथील सामन्यापूर्वी राहुल तंदुरुस्त झाला आणि त्याला अतिरिक्त खेळाडू म्हणून संघात निवडले आणि गंभीरऐवजी त्याला अंतिम संघातही स्थान देण्यात आले होते. आता उर्वरित तीन सामन्यांसाठी गंभीरला वगळले जाणार, हे अपेक्षित होते. विशाखापट्टणला सामना सुरू असताना गंभीरला दिल्लीतून रणजी सामना खेळण्यासाठी मुक्त करण्यात आले तेथेच त्याला भारतीय संघात स्थान मिळणार नसल्याचे संकेत मिळाले होते. 

न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर भुवनेश्‍वर कुमार जखमी झाला होता; परंतु त्याने विश्रांतीनंतर मुंबईविरुद्धच्या रणजी सामन्यातून आपली तंदुरुस्ती सिद्ध केली. त्यामुळे त्याला पुन्हा स्थान देण्यात आले आहे. 

संघ ः विराट कोहली (कर्णधार), अजिंक्‍य रहाणे (उपकर्णधार), के. एल. राहुल, मुरली विजय, चेतेश्‍वर पुजारा, करुण नायर, वृद्धिमन साहा, आर. अश्‍विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, अमित मिश्रा, महंमद शमी, उमेश यादव, ईशांत शर्मा, भुवनेश्‍वर कुमार, हार्दिक पंड्या.

Web Title: Gautam Gambhir dropped