esakal | अर्ध्यावरती डाव मोडला... 
sakal

बोलून बातमी शोधा

अर्ध्यावरती डाव मोडला... 

अर्ध्यावरती डाव मोडला... 

sakal_logo
By
शैलेश नागवेकर

गौतम गंभीर... या नावात गंभीर हा जसा शब्द आहे. तसा त्याचा स्वभावही धीरगंभीर असाच आहे. अनेकदा वादात सापडतो. पटकन राग येणारा, त्यामुळे प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया खेळाडूंबरोबर त्याची अनेकदा तू...तू...मैं...मैं... झालेली आहे. (मुळात ऑस्ट्रेलियन खेळाडू अशा खेळाडूंना सॉफ्ट टार्गेट करत असतात). गंभीरने मात्र अधून मधून आपल्याच मग तो दिल्लीचा संघ असो वा भारतीय संघ सहकाऱ्यांशी पंगा घेतलेला आहे.

दोन मोसमापूर्वी तर दिल्लीच्या रणजी प्रशिक्षकांबरोबर त्याचे वाजले होते. परिणामी, दिल्ली संघाच्या कर्णधारपदावरून त्याला पायउतार व्हावे लागले. भारतीय संघात असताना तो भरवशाचा सलामीवीर होता. तेंडुलकर, द्रविड, लक्ष्मण यांच्याएवढा सुपरस्टार नसला तरी तो स्टार होता. अनेक विजयाची त्याची पायाभरणी निर्णायक ठरलेली आहे. भारताच्या दोन विश्वविजेतेपदाचा (ट्‌वेन्टी-20 आणि 50-50) साक्षीदार आहे. 2011 मध्ये मिळवलेल्या एकदिवसीय विश्वविजेतेपदामध्ये कर्णधार धोनीची खेळी सर्वांना आठवते; परंतु सेहवाग आणि तेंडुलकर स्वस्तात परतल्यावर भारताला गंभीरने विजेतेपदाजवळ नेले होते. हे झाले त्याचे देशाकडून खेळताना दिलेले योगदान. आयपीएलमध्ये त्याने कोलकाताला दोन विजेतेपद कर्णधाराच्या भूमिकेतून मिळवून दिलेले आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वांत यशस्वी कर्णधारांची नावे घ्यायची झाल्यास रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी आणि गौतम गंभीर हेच कर्णधार पुढे येतात;

पण आयपीएल ही व्यावसायिक स्पर्धा आहे. संघमालकांनी लाखो रुपये मोजलेले असतात. त्यामुळे त्याच्या मोबदल्याचाही विचार त्यांच्याकडून होत असतोच. परिणामी, शारीरिक आणि मानसिक दमछाक होत असली, तरी आपले नाणे खणखणीत वाजवण्याची जबाबदारी खेळाडूंवर असते. काही वेळा अपयशी ठरत असलेल्या खेळाडूंना वगळण्यात येते, तर काही खेळाडू स्वतःहून बाजूला होतात. 

गंभीरचा स्वभाव कितीही धीरगंभीर असला, तरी तो कमालीचा विचारी आहे. त्याचा स्वाभिमान पराकोटीचा आहे आणि तो संवेदनशीलही आहे. काश्‍मीरमध्ये हुतात्मा झालेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या झोहरा या मुलीच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलण्याचे तो जाहीर करतो. अशा समाजकार्याची जाण असलेले फारच उच्च विचारांचे असतात. त्यामुळे असे विचारी खेळाडू आत्मसन्मान जपत असतात आणि त्याच्यासाठी कोणतेही बलिदान देण्यास तयार असतात. पैसा हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा नसतो, म्हणूनच यंदा आयपीएलमध्ये दिल्ली संघ अपयशी ठरत असताना त्याने कर्णधारपद सोडले. हा खरं तर धक्कादायक निर्णय होता. कारण या नियमाने रोहित शर्मानेही विचार करायला हवा; पण गंभीरने दिल्ली संघाच्या मालकांचा एकही पैसा न घेऊन फुकट खेळण्याचेही ठरवले. आता अचानक मध्येच संघ सोडणे, इतर खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम करणारे ठरेल. म्हणून तो संघातून लगेचच दूर झालेला नाही; पण येत्या काळात त्याने आयपीएलमधून निवृत्ती घेतली तर त्याचे आश्‍चर्य वाटायला नको. दिल्लीच्या पुढील सामन्यात तो डगआऊटमध्ये किती बसलेला दिसेल, हे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

पॉंटिंग आणि गंभीर 
योगायोग कसा असतो, आपल्या नेतृत्वाखाली संघ अपयशी ठरत असल्यामुळे मध्यावरच नेतृत्व सोडण्याचे प्रकार या अगोदरही घडले आहेत. रिकी पॉंटिंग हे त्यातील मोठे उदाहरण. कारण तो ऑस्ट्रेलियाचा सर्वांत यशस्वी कर्णधार होता; पण व्यावसायिक लीगमध्ये भूतकाळापेक्षा वर्तमान महत्त्वाचे असते. पॉंटिंगने नेतृत्व सोडले आणि रोहित मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला आणि चमत्कार काय तर मुंबईने 2015 मध्ये विजेतेपद मिळवले. हाच पॉंटिंग आता दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक आहे. गंभीरने पॉंटिंगच्या मार्गाने वाटचाल केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना पॉंटिंग आणि गंभीर यांच्यामध्ये किती खटके उडाले असतील, हे त्या दोघांनाच माहिती. 

इतरांवरची जबाबदारी वाढली 
संघात कर्णधार अथवा खेळाडू म्हणून योगदान देत नसल्यामुळे स्वतःहून बाजूला होण्याच्या गंभीरच्या या निर्णयामुळे इतर कर्णधारांवरची जबाबदारी वाढली आहे. भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला आता सिद्ध करण्यासारखे काहीच राहिले नाही; परंतु दोन वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या चेन्नई संघासाठी तो हुकमी खेळाडू म्हणूनही फिनिशरची भूमिका बजावत आहे. दुसऱ्या बाजूला विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे बेंगळुरु व मुंबई हे संघ गटांगळ्या खात आहेत हे दोघेही भारताचे कर्णधार आहेत. त्यामुळे आयपीएलमधील नेतृत्व सोडणे त्यांच्यासाठी सोपे नाही. परिणामी, त्यांना स्वतःचे योगदान तरी कमालीचे उंचवावे लागणार आहे. 

आत्तापर्यंत मध्यावरच नेतृत्व सोडलेले कर्णधार 

2008 : लक्ष्मणऐवजी गिलख्रिस्ट 
आयपीएलच्या पहिल्या हंगामात व्ही. व्ही. एस. लक्ष्मण डेक्कन चार्जर्सचा आयकॉन खेळाडू होता. पण, कर्णधाराच्या नात्यातून संघ चांगली कामगिरी करत नसल्यामुळे त्याने माघार घेतली आणि ऍडम गिलख्रिस्ट कर्णधार झाला. तरीही संघाचे नशीब बदलले नाही आणि त्यांचा संघ तळालाच राहिला. 

2008 : सचिन-हरभजन-पोलॉक 
आयपीएलच्या या पहिल्याच हंगामात मुंबई इंडियन्सचा कर्णधार सचिन तेंडुलकर दुखापतीमुळे खेळू शकणार नव्हता. त्याच्याऐवजी हरभजनसिंग कर्णधार झाला; परंतु श्रीशांतबरोबर झालेल्या चकमकीनंतर त्याच्यावर बंदी घालण्यात आली आणि शॉन पोलॉक तिसरा कर्णधार झाला. 

पीटरसन ते कुंबळे 
2009 च्या आयपीएलच्या या दुसऱ्या हंगामात बेंगळुरु संघाचा केविन पीटरसन कर्णधार होता; परंतु आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी तो मध्यावरच परतला आणि त्याच्याऐवजी अनिल कुंबळे कर्णधार झाला. आणि त्याच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. 

व्हिटोरीऐवजी कोहली 
2012 या हंगामात डॅनियल व्हिटोरीला कर्णधारपदावरून दूर करण्याचा निर्णय बेंगळूरुच्या संघ व्यवस्थापनाने घेतला आणि उर्वरित सामन्यांसाठी विराट कोहलीकडे नेतृत्व दिले. त्याने पुढील आठपैकी सहा सामन्यांत संघाला विजय मिळवून दिले. त्यानंतर कोहली पूर्णवेळ कर्णधार झाला. 

संगकाराऐवजी व्हाईट 
2012 च्या स्पर्धेत पुन्हा मध्यावर कर्णधार बदलण्याची वेळ डेक्कन चार्जर्सवर आली. चांगली कामगिरी होत नसल्यामुळे कुमार संगकाराने नेतृत्व सोडले आणि त्या ठिकाणी कॅमेरून व्हाईट कर्णधार झाला; पण त्याचा क्रमांक शेवटचाच राहिला. 

पॉंटिंगनेही सोडले नेतृत्व 
2015 मधील ही घटना सर्वांत मोठी आश्‍चर्याची ठरली होती. रिकी पॉंटिंगने सहा सामन्यांनंतर नेतृत्व सोडले आणि रोहित प्रथमच कर्णधार झाला. मुंबई संघाचे दैव पालटले आठ विजय मिळवत आगेकूच केली, विजेतेपदही मिळवले एवढेच नव्हे तर चॅम्पियन्स लीगही जिंकली. 

धवनऐवजी सॅमी 
2014 च्या स्पर्धेत 10 सामन्यांत 215 धावा करूनही शिखर धवनने हैदराबाद संघाचे नेतृत्व सोडले. त्याच्याऐवजी वेस्ट इंडीजचा डॅरेन सॅमी कर्णधार झाला. त्या स्पर्धेत हैदराबादने सहाव्या स्थानापर्यंत मजल मारली. 

वॉटनसऐवजी स्मिथ असा झाला बदल 
2015 च्या मोसमात राजस्थान रॉयल्सच्या नेतृत्वात अचानक बदल झाला. शेव वॉटसनऐवजी त्याच्याच देशाचा स्टीव स्मिथ नाणेफेकीला आला आणि सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला होता. 

loading image