रांचीतील खेळीचे मोल वेगळेच - मॅक्‍सवेल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

रांची - कारकिर्दीमधील सहावीच कसोटी खेळताना ग्लेन मॅक्‍सवेल याने पहिले शतक झळकावले. एरवी मर्यादित षटकांतील सामन्यातील खेळाडू म्हणून ओळखला जाणारा मॅक्‍सवेल या सामन्यात कमालीचा संयमी खेळला. कसोटी क्रिकेटचे महत्त्व त्याच्या खेळीतून जाणवत होते. तो म्हणाला, ""लाल चेंडूचा मला नेहमीच मोह होतो. कसोटी क्रिकेट हा क्रिकेटपटूच्या क्षमतेचा कस पाहणारा प्रकार आहे. त्यामुळेच मी माझी ओळख पुसून काढण्यासाठी आतुर होतो.''

कसोटी क्रिकेट खेळण्याची पुन्हा मिळालेली संधी सोडायची नाही हे ठरवूनच खेळ केला, असे सांगून मॅक्‍सवेल म्हणाला, 'मी फलंदाजीला उतरलो तेव्हा ऑस्ट्रेलिया संघ अडचणीत आला होता. स्मिथ स्थिरावलेला होता. त्याला साथ देणे महत्त्वाचे होते. त्यानेही सरळ बॅटचा वापर करण्याचा सल्ला दिला. जम बसल्यावर माझा आत्मविश्‍वास वाढला आणि धावा होत राहिल्या. संघाला गरज असताना शतकी खेळी झाल्याने मला रांचीतील खेळीचे मोल वेगळे वाटते.'' खेळपट्टीचे खरे स्वरूप अजूनही समोर येत नसले, तरी तिसऱ्या दिवशी कमिन्स हीरो ठरेल असा विश्‍वास त्याने व्यक्त केला.

जडेजा प्रभावी - यादव
स्मिथचे फलंदाजीचे तंत्र विचित्र आहे. तो कधी कमी आत सरकतो, तर कधी खूप जास्त. त्यामुळे त्याला गोलंदाजी करताना त्याच्या हालचालीकडे लक्ष देऊन शेवटच्या क्षणी बदल करावा लागतो, असे मत भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने व्यक्त केले. यानंतरही जडेजाने आज चांगली गोलंदाजी केल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला, ""जडेजाच्या गोलंदाजीला दाद द्यावी लागेल. कुठल्याही खेळपट्टीवर तो टप्पा आणि दिशा पकडून गोलंदाजी करतो. त्यामुळे त्याला यश मिळते. ऑस्ट्रेलियाने 451 धावा केल्या असला, तरी आम्ही दुसऱ्या दिवसअखेरीस 120 धावा करून चांगली सुरवात केली आहे. खेळपट्टी अजूनही फलंदाजीला साथ देत आहे. त्यामुळे उद्या आमच्याकडून चांगल्या भागीदारी होणे आवश्‍यक आहे.''

विराट फलंदाजीला येणार
भारताचा कर्णधार विराट कोहली याची दुखापत अजून बरी झालेली नाही. दुसऱ्या दिवशीही तो मैदानात उतरला नव्हता. संघातील सहायक सातत्याने त्याच्या खांद्यावर बर्फ फिरवत आहेत. दुखापत झाल्यापासून 48 तास कोहलीला पूर्ण विश्रांती मिळाल्यानंतरच त्याच्या दुखापतीचा खरा अंदाज येईल. तसेच विराट नेहमीप्रमाणे फलंदाजीला उतरेल असे संघ व्यवस्थापनाने सांगितले.

Web Title: glane maxwell talking