World Cup 2019 : पिचाई यांची भविष्यवाणी; वर्ल्डकप फायनल होणार 'या' दोन संघात

वृत्तसंस्था
Thursday, 13 June 2019

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि इंग्लंड या संघांदरम्यान खेळला जाणार, अशी भविष्यवाणी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी व्यक्त केली आहे.

वॉशिंग्टन : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि इंग्लंड या संघांदरम्यान खेळला जाणार, अशी भविष्यवाणी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी व्यक्त केली आहे. काल (ता.12) येथे झालेल्या यूएसआयबीसीच्या इंडिया आयडिया समिटमध्ये पिचाई यांना ग्लोबल लीडरशिप अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना पिचाई यांनी ही भविष्यवाणी केली.

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पोम्पियो यांच्यासह भारत आणि अमेरिकेतील काही प्रमुख कॉर्पोरेट अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

विश्वकरंडकच्या अंतिम सामन्याबद्दल पिचाई यांना विचारले असता ते म्हणाले, "ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे संघदेखील विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहे, पण आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंड आणि भारत या दोन संघांदरम्यान खेळला जाणार, असे मला वाटते.''

पिचाई म्हणाले, ''इंग्लंडमध्ये आयसीसी विश्वकरंडक ही जगातील सर्वोत्तम क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. मी भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करतो, पण ही स्पर्धा जिंकणं तितकं सोपं नाहीय."

अन् मी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला : पिचाई

पिचाई म्हणाले, "जेव्हा मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो, तेव्हा मी बेसबॉल खेळण्याचा प्रयत्न केला, पण मला तो खेळ खेळणे थोडे कठीण गेले. जेव्हा पहिल्यांदा मी हा खेळ खेळलो तेव्हा मी चेंडू मैदानाबाहेर टोलवला होता. तेथे उपस्थित असणाऱ्यांपैकी कोणाला तो आवडला नाही.'' 

ते पुढे म्हणाले, "जेव्हा मी बेसबॉल खेळत होतो, तेव्हा बॅट हातात घेऊन पळत होतो. बेसबॉल खेळताना बॅट व्यतिरिक्त पळणे मला थोडे विचित्र वाटले. त्यामुळे बेसबॉल खेळण्यापेक्षा क्रिकेटच खेळण्याचा मी निर्णय घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Googles Sundar Pichai predicts India vs England final