हजारे करंडक आगीच्या घटनेनंतर उपांत्य सामना रद्द

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

खेळाडू सुरक्षित, सामना शनिवारी होणार
नवी दिल्ली - झारखंड संघाचे खेळाडू उतरलेल्या थ्री स्टार हॉटेलमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतर शुक्रवारी झारखंड-बंगाल दरम्यान होणारा विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेचा उपांत्य सामना रद्द करण्यात आला. आता हा सामना उद्या शनिवारी खेळविण्यात येईल. झारखंडचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह सर्व खेळाडू सुखरुप असल्याचे हॉटेल व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

खेळाडू सुरक्षित, सामना शनिवारी होणार
नवी दिल्ली - झारखंड संघाचे खेळाडू उतरलेल्या थ्री स्टार हॉटेलमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतर शुक्रवारी झारखंड-बंगाल दरम्यान होणारा विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेचा उपांत्य सामना रद्द करण्यात आला. आता हा सामना उद्या शनिवारी खेळविण्यात येईल. झारखंडचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह सर्व खेळाडू सुखरुप असल्याचे हॉटेल व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

येथील द्वारका परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये झारखंडचे खेळाडू उतरलेले होते. आज सकाळीच हॉटेलमधील तळ मजल्यावर आग लागल्याचे निदर्शनास आले. सर्वत्र धुराचे साम्राज्य परसलेले होते. सर्व खेळाडूंना वेळीच सुखरूप बाहेर काढण्यात आले. हॉटेलमध्ये धुराची सूचना देणारी यंत्रणा नसल्यामुळे तातडीने आगीची कल्पना येऊ शकली नाही.
झारखंडचा खेळाडू इशांक जग्गी आगीची माहिती देताना म्हणाला, 'आम्ही सकाळी 7.30 वाजता हॉटेलच्या लॉबीत एकत्र येणार होतो. मात्र, 7 वाजताच सहकारी प्रत्युष सिंगने खाली तळमजल्यावर आग लागली असून, कुणीही रूमच्या बाहेर पडू नये असे सांगितले. आग इतकी झपाट्याने पसरत होती, की आम्हाला सातव्या मजल्यावरून तातडीने हलवण्यात आले. धूर इतका झाला होता, की लॉबीमध्ये जवळचेही काही दिसत नव्हते.''

थोडक्‍यात बचावलो
संघातील बहुतेक खेळाडूंची नशीब बलवत्तर म्हणूनच वाचलो अशीच प्रतिक्रिया होती. "आगीची सूचना देणारी यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे आम्हाला आग छोटीशीच असल्याचे वाटले; पण जेव्हा जळण्याचा वास मोठ्या प्रमाणावर येऊ लागला, तेव्हा आम्हाला मजला तातडीने खाली करण्यास सांगितले. तेथून जेव्हा बाहेर पडलो तेव्हा आगीची तीव्रता आम्हाला समजली. धुराचे लोट आमच्या रुम्सपर्यंत येऊन पोचल्याचे आम्ही जिन्यावरून उतरताना पाहिले,' असे खेळाडूंनी सांगितले.

झारखंडचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी देखील सहकाऱ्यांसह याच हॉटेलमध्ये उतरला होता. या सर्व खेळाडूंना नंतर थेट पालम मैदानावर नेण्यात आले. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग विझवण्यात यश आले. अग्निशामक दलाचे तब्बल तीस बंब आग विझविण्यासाठी दाखल झाले होते.

अंतिम सामनाही पुढे ढकलला
आगीमुळे झारखंड संघातील खेळाडू काहीसे घाबरलेले होते. त्यांचे साहित्यही आगीत जळून खाक झाले. त्यामुळे आज बंगालविरुद्ध होणारा त्यांचा उपांत्य सामना रद्द करण्यात आला. तो उद्या शनिवारी फिरोजशाह कोटला मैदानावर खेळविण्यात येईल. यामुळे अंतिम सामनाही सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. अंतिम सामनाही कोटला मैदानावर होईल.

Web Title: hajare karandak match cancel by fire