हार्दिक पंड्या 'कसोटी'मध्ये का?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), आर. आश्‍विन, गौतम गंभीर, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, महंमद शमी, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), करुण नायर, मुरली विजय, उमेश यादव, हार्दिक पंड्या, ईशांत शर्मा, जयंत यादव.

कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळविलेल्या भारतीय संघाची मायदेशातील एक खडतर परीक्षा पुढच्या आठवड्यापासून सुरू होत आहे. गेल्या काही वर्षांत कसोटीमधील कामगिरीत कमालीची सुधारणा केलेल्या ऍलिस्टर कूकच्या इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका येत्या 9 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. नित्यनेमाने, या मालिकेसाठीच्या संघनिवडीमध्येही भारतीय संघाने बदल केले आहेत. आता यावेळी हार्दिक पांड्या भारतीय संघात असेल. म्हणजे, आधी स्टुअर्ट बिन्नी होता तसा.. किंवा ऋषी धवन होता तसा..! बाहेर 'बारावा' खेळाडू म्हणून..!

इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड आज (बुधवार) झाली. त्यामध्ये एक आश्‍चर्याचा धक्का म्हणजे हार्दिक पांड्याची निवड. हार्दिक पांड्या प्रकाशझोतात आला तो 'आयपीएल'मधील मुंबई इंडियन्समधून केलेल्या कामगिरीमुळे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने चमक दाखवल्यामुळे भारतीय संघातील अष्टपैलू जागेसाठी लगेचच त्याची उमेदवारी दाखल झाली. 'वेगवान गोलंदाजी करू शकणारा अष्टपैलू' ही भारतीय संघाची नेहमीची डोकेदुखी आहे. गेली किमान 20 वर्षे भारतीय संघ अशा अष्टपैलू खेळाडूंच्या शोधात आहे आणि या जागेसाठी तपासून पाहिलेल्या खेळाडूंची यादी मोठी आहे.

अर्थात, भारतीय संघातील अनेक खेळाडू सध्या दुखापतींनी त्रस्त आहेत. सलामीवीर के. एल. राहुल, शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्यासह वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमारही दुखापतग्रस्त आहेत. यामुळे निवड समितीसमोरील पर्यायांवर नक्कीच मर्यादा आल्या. हार्दिक पांड्या आतापर्यंत केवळ 16 प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये खेळला आहे. यात त्याने 727 धावा केल्या आणि 22 गडी बाद केले. ही कामगिरी कसोटी संघात दाखल होण्यासाठी पुरेशी आहे का, असा प्रश्‍न पडू शकतो.

'हार्दिक पांड्याला कसोटी संघात स्थान का दिले' याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीने दिलेले उत्तर भन्नाट आहे. 'अलीकडे पंड्याच्या गोलंदाजीतील वेग वाढला आहे. तो चेंडू चांगला 'स्विंग' करू शकतो. त्याची फलंदाजीही सुधारली आहे..' हे उत्तर आहे निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांचे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतील नवे नाव म्हणून याचे स्वागत करायलाही हवे. पण याआधी श्रीलंकेच्या दौऱ्यावर नेलेल्या स्टुअर्ट बिन्नीचं काय झालं? प्रथमश्रेणीमधील त्यांची कामगिरी मुळातच भक्कम नसेल, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर 'टेस्ट' करण्यात काय अर्थ आहे?

हार्दिक पांड्याच्या निवडीवर टीका करण्यात अर्थ नाही. हार्दिक तरुण आहे, गोलंदाजी व्यवस्थित करतो, आक्रमक फलंदाजीही करतो आणि मुख्य म्हणजे त्याचे क्षेत्ररक्षणही चांगले आहे. योग्यरित्या हाताळले आणि त्याने तंदुरुस्ती राखली तर हार्दिक कदाचित भारताचा बहुप्रतिक्षित वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू होऊ शकेलही! टीका करायचीच झाली, तर ती निवड समितीच्या धोरणांवर! काही वर्षांपूर्वी आपल्याला इरफान पठाणसारखा एक खेळाडू मिळाला होता. भेदक गोलंदाजी करू शकणारा इरफान वेळप्रसंगी फलंदाजीही करू शकत होता. पण 'अष्टपैलू' तयार करण्याच्या आपल्या ध्यासाने आणि तत्कालीन चॅपेल गुरुजींच्या आचरट प्रयोगांमुळे इरफानला आपण मारून-मुटकून फलंदाज केले. त्याला सलामीलाही पाठवले. यातून त्याची अफलातून स्विंग करण्याची शैली हरवली, ती पुन्हा कधीच गवसली नाही. इरफानसारखा उत्तम दर्जाचा स्विंग गोलंदाज आपण 'अष्टपैलू' आणण्याच्या प्रयत्नांत गमावला.

तात्पर्य : हार्दिक पांड्याला कसोटीमध्ये संधी देणे चांगलेच आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे की धोरणामध्ये सातत्य राखणं आणि वाट्टेल ते प्रयोग न करणे. अन्यथा, चांगली गोलंदाजी, उत्तम क्षेत्ररक्षण आणि बरी फलंदाजी करणाऱ्या हार्दिकला उद्या 'कसोटीत सलामीवीराची जागा रिकामी आहे, या सामन्यात तिथे फलंदाजी कर' वगैरे 'धोरणात्मक निर्णय' घेऊ लागलो, तर सगळंच अवघड होईल..

Web Title: Hardik Pandya is in India's Test squad against England