हरमनप्रीतच्या खेळीने महिलांचा दुसरा विजय भारताची थायलंडवर 66 धावांनी मात

वृत्तसंस्था
Tuesday, 5 June 2018

संक्षिप्त धावफलक 
भारत 20 षटकांत 4 बाद 132 (मोना मेश्राम 32, हरमनप्रीत कौर नाबाद 27, लिएगप्रासर्ट 2-16) वि.वि. थायलंड 8 बाद 66 (बूचाथाम 21, हरमनप्रीत 3-11, दिप्ती शर्मा 2-16) 

क्‍वाललांपूर (मलेशिया) - कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय महिलांनी आशिया करंडक टी 20 क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांनी सोमवारी थायलंडचा 66 धावांनी पराभव केला. 

प्रथम फलंदाजी मिळाल्यावर भारताने 4 बाद 132 धावा केल्या. त्यानंतर थायलंडला 8 बाद 66 धावांवर रोखून त्यांनी आणखी एका मोठ्या विजयाला गवसणी घातली. सहा संघांच्या स्पर्धेत भारत दोन विजयासह आघाडीवर आहे. 

भारताच्या धावसंख्येत मोना मेश्रामच्या 45चेंडूंतील 32 धावांचा मोठा वाटा होता. हरमनप्रीत हिने 17 चेंडूंत नाबाद 27 धावांचे योगदान देत भारताचे आव्हान भक्कम केले. स्मृती मानधना हिनेही 22 चेंडूंत वेगवान 29 धावा केल्या. 

हरमनप्रीतने नंतर गोलंदाजीतही चमक दाखवली. तिने आपल्या ऑफ स्पिन गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांची फिरकी घेत तीन गडी बाद केले. दीप्ती शर्माने दोन गडी बाद करत तिला सुरेख साथ दिली. थायलंडकडून नट्टाया बूचाथॅम हिने सर्वाधिक 40 धावा केल्या. भारतीयांच्या अचूक गोलंदाजीमुळे त्यांना आव्हानाचा पाठलाग करण्यात अपयश आले. 

अन्य एका सामन्यात सर्वांगीण कामगिरी करत बांगलादेशाने पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला. पाकिस्तानला 5 बाद 95 असे रोखल्यावर बांगलादेशाने 17.5 षटकांत 3 बाद 96 धावा केल्या. स्पर्धेत उद्या विश्रांतीचा दिवस असून भारताचा तिसरा सामना बांगलादेशाशी होईल. 

संक्षिप्त धावफलक 
भारत 20 षटकांत 4 बाद 132 (मोना मेश्राम 32, हरमनप्रीत कौर नाबाद 27, लिएगप्रासर्ट 2-16) वि.वि. थायलंड 8 बाद 66 (बूचाथाम 21, हरमनप्रीत 3-11, दिप्ती शर्मा 2-16) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harmanpreet Kaur Shines As India Beat Thailand By 66 Runs