कोहलीच्या आक्रमकतेला आवरणार कोण?

हर्षदा कोतवाल 
बुधवार, 12 जुलै 2017

'मी म्हणेन ती पूर्व दिशा' अशा कोहलीच्या स्वभावाला 'बीसीसीआय'ने वेळीच आवर घातला पाहिजे. प्रशिक्षक बदलाची मागणी मान्य झाली असली, तरीही त्याच्या यापुढील मागण्यांवर मर्यादा घालण्याची गरज आहे.

'भारतीय क्रिकेट संघाचा सर्वांत यशस्वी कर्णधार' म्हणून ख्याती असलेल्या 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपदाची धुरा उतावीळ विराट कोहलीकडे सोपविली, तेव्हा कोहलीकडून अनेक अपेक्षा होत्या. पण सध्याची परिस्थिती पाहता कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्यात कोहली कितपत यशस्वी झाला, याबाबत शंकाच आहे. 

प्रचंड तणावाखालीही अत्यंत शांतपणे परिस्थिती हाताळणाऱ्या धोनीकडून भारतीय संघाचे नेतृत्व आक्रमक स्वभावाच्या विराट कोहलीकडे गेले. यानंतर संघाच्या कार्यपद्धतीमध्ये अचानक बदल घडून आला. सुरवातीला कौतुकास्पद वाटणारी कोहलीची आक्रमक शैली आता हाताबाहेर जाऊ लागल्याचे दिसत आहे. 

मैदानावर घडणाऱ्या प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींवर कर्णधाराने प्रतिक्रिया देण्याची गरज नसते. मैदानावर कर्णधार जितका शांत असेल, तेवढी तो एकाग्रतेने कामगिरी करू शकतो. पण कोहलीची मैदानावरील वागणूक कधीच कर्णधाराला साजेशी नव्हती. प्रतिस्पर्ध्यांशी हुज्जत घालणे, स्वत:च्या खेळीत अकारण आक्रमकता दाखविणे, सहकाऱ्यांच्या क्षेत्ररक्षणातील चुकांवर तातडीने 'रिऍक्‍ट' होणे या सगळ्यांतून कोहलीच्या उतावीळपणाचेच दाखले मिळतात. 'आयपीएल'मध्ये कोहली आणि गंभीर यांच्यात झालेला वादही सर्वश्रुत आहेच..! 

विराट कोहलीची तुलना सचिन तेंडुलकरशी केली जाते. कोहली हा नक्कीच उत्तम खेळाडू आहे. येत्या काही महिन्यांतच तो सचिनचे अनेक विक्रम मोडेल, यात काहीच शंका नाही. विराट आणि सचिनमध्ये आणखी एक साम्य आहे. सचिन जितका दर्जेदार खेळाडू होता, तितका उत्कृष्ट कर्णधार तो कधीच होऊ शकला नाही. कारण उत्तम कर्णधार होण्यासाठी फक्त चांगला खेळाडू असणे पुरेसे नसते. कर्णधारपद सांभाळण्यासाठी नेतृत्वगुण असणे आवश्‍यक असते. विजयाने हुरळून न जाणे आणि पराभवाने खचून न जाता काम करत राहणे, हा गुण तर कर्णधारामध्ये असणे आवश्‍यकच असते. कोहली कमी पडतो तो नेमका इथेच..! 

सामना किंवा मालिका जिंकल्यानंतर धोनी कधीच सोहळ्यात मग्न झाला नाही किंवा हरल्यानंतर दु:खही करत बसला नाही. खेळात हार-जीत होतच असते. झालेल्या सामन्यावर विचार करत बसण्यापेक्षा पुढील सामन्याची तयारी करण्यास धोनीने जास्त प्राधान्य दिले. पण विजय असो वा पराभव, कोहली मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये लगेच प्रतिक्रिया देतो. संघातील एखाद्या खेळाडूची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होत नसल्यास कर्णधाराने त्याला पाठिंबा देण्याची गरज असते. 2007 मधील ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा असो वा 2013 मधील चॅंपियन्स करंडक स्पर्धा.. जोगिंदर शर्मा आणि ईशांत शर्मा यांच्यावर धोनीने दाखविलेल्या विश्‍वासाचेच हे फलित आहे. अतिआक्रमक स्वभावामुळे कोहली इथे कमी पडतो. 

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावरून झालेल्या वादामधून सर्व हक्क स्वत:कडे ठेवण्याचा कोहलीचा अट्टाहास स्पष्ट दिसून आला. कोहलीच्या अशा वागणुकीमुळे भारतीय संघाला प्रशिक्षकाशिवायच वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जावे लागले. त्यानंतर प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची मुदत 'बीसीसीआय'ने रवी शास्त्री यांच्यासाठीच वाढविली होती. ज्या अर्थी रवी शास्त्री यांच्याकडे पुन्हा प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे, त्याअर्थी या निवडीमध्ये कोहलीच्या मताला जास्त महत्त्व दिल्याचे स्पष्ट होत आहे. 'बीसीसीआय'ने कितीही नाकारले, तरीही शास्त्री यांच्या निवडीमागे कोहलीच्या मताचा विचार केला गेला आहे, यात काहीच शंका नाही. 

'मी म्हणेन ती पूर्व दिशा' अशा कोहलीच्या स्वभावाला 'बीसीसीआय'ने वेळीच आवर घातला पाहिजे. प्रशिक्षक बदलाची मागणी मान्य झाली असली, तरीही त्याच्या यापुढील मागण्यांवर मर्यादा घालण्याची गरज आहे. आता कोहलीला सगळे त्याच्या मनासारखे मिळाले आहे. त्यामुळे फक्त वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करून चालणार नाही, तर कर्णधार म्हणूनही स्वत:ला सिद्ध करून दाखविण्याचे आव्हान आता कोहलीसमोर आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harshada Kotwal writes about Virat Kohli aggressive