पावसामुळे ऑस्ट्रेलिया संघाला 3 लाख डॉलरचा फटका

वृत्तसंस्था
बुधवार, 29 मार्च 2017

दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्या कसोटीत पराभवाच्या उंबरठ्यावर होता. त्यांचे 5 गडी बाद झाले होते. आफ्रिकेचा संघ पराभूत झाला असता तर मालिका 1-1 बरोबरीत राहिली असती आणि ते क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर राहिले असते.

मेलबर्न - पावसामुळे दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामना अनिर्णित राहिल्याने ऑस्ट्रेलिया संघाला तब्बल 3 लाख डॉलरचा फटका बसला आहे. क्रमवारीतही ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर गेला आहे.

हॅमिल्टन येथे सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा आजचा पाचवा दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे ही कसोटी अनिर्णित राहिली आणि दक्षिण आफ्रिकेने 1-0 अशी मालिका जिंकली. या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ मोसमाच्या अखेर कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर राहिला. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाला आयसीसीकडून 5 लाख अमेरिकन डॉलरचे बक्षिस देण्यात आले. तर, तिसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला 2 लाख डॉलर देण्यात आले. भारतीय संघ अव्वल स्थानावर असल्याने दहा लाख डॉलरचे बक्षिस आणि मानाची गदा देण्यात आली.

दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्या कसोटीत पराभवाच्या उंबरठ्यावर होता. त्यांचे 5 गडी बाद झाले होते. आफ्रिकेचा संघ पराभूत झाला असता तर मालिका 1-1 बरोबरीत राहिली असती आणि ते क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर राहिले असते. पण, पावसामुळे दक्षिण आफ्रिकेला याचा फायदा आणि ऑस्ट्रेलिया संघाला बक्षिसाच्या रकमेचा 3 लाख डॉलरचा फटका बसला.

Web Title: Heavy rain costs Australia $300,000