सर्वोच्च स्तरावर खेळण्याचा आत्मविश्‍वास मिळाला - पांड्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

कानपूर - भारतीय संघात पुन्हा स्थान मिळाल्यावर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीने आपल्याला सर्वोच्च स्तरावर खेळण्याचा आत्मविश्‍वास मिळाला, अशी प्रतिक्रिया हार्दिक पांड्या याने व्यक्त केली.

कानपूर - भारतीय संघात पुन्हा स्थान मिळाल्यावर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीने आपल्याला सर्वोच्च स्तरावर खेळण्याचा आत्मविश्‍वास मिळाला, अशी प्रतिक्रिया हार्दिक पांड्या याने व्यक्त केली.

विश्‍वकरंडक टी- 20 स्पर्धेनंतर हार्दिकने संघातील स्थान गमावल्यावर मी स्वतःला घडवले. झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला. याच कालावधीने मला घडवले, असे सांगून पांड्या म्हणाला, 'टी- 20 विश्‍वकरंडकानंतर संघातील स्थान गमाविल्यामुळे निराश झालो होतो.

पण, याच कालावधीत आपल्याला प्रगती करण्याविषयी विचार करायला वेळ मिळाला. त्याच सुमारास "अ' संघाकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्याची संधी मिळाली आणि मला माझ्या खेळाविषयी अभ्यास करता आला. प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले. सहाय्यक प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांच्या सूचनाही महत्त्वाच्या ठरल्या.''

अ संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी पांड्याला कसोटी संघात स्थान मिळाले. मात्र, खांद्याच्या दुखापतीमुळे तो पूर्ण मालिका खेळू शकला नाही. त्यानंतर तंदुरुस्ती सिद्ध केल्यावर एकदिवसीय संघात स्थान मिळाले आणि ही मालिका त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला वळण देणारी ठरली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात निर्णायक क्षणी तो महत्त्वपूर्ण खेळी करून बाद झाला. या विषयी पांड्या म्हणाला, 'त्या क्षणी माझ्याकडून चूक झाली. या चुकांमधून मला शिकायला मिळाले. आवश्‍यक धावगती वाढत होती. त्यामुळे मी धोका पत्करावा असा विचार केला. मी बाद झालो, पण भविष्यात पुन्हा जर अशी वेळ आली, तर मी निश्‍चित वेगळा विचार करेन.''

टी- 20 सामन्यांच्या मालिकेत हार्दिकला आशिष नेहराच्या साथीत नवा चेंडू हाताळायचा आहे. हार्दिक म्हणाला, ""फार काही फरक पडणार नाही. नेहराबरोबर यापूर्वी देखील खेळलो आहे आणि माझा त्याच्याशी समन्वय चांगला आहे. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमुळे मला आत्मविश्‍वास मिळाला आहे. त्याचा फायदाच होईल.''

एखाद्या महत्त्वाच्या मालिकेत जेव्हा तुमच्यासाठी चांगली कामगिरी होते. त्या वेळी तुमचा आत्मविश्‍वास बळावतो. महत्त्वाचे म्हणजे आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर उभे राहू शकतो, असा विश्‍वास मला मिळाला.
- हार्दिक पांड्या, भारताचा अष्टपैलू खेळाडू

Web Title: The highest level of confidence was playing