तुम्ही कोहलीला डिवचु नका; अन्यथा...: हसी

पीटीआय
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

कोहली याच्याबरोबर शाब्दिक वादावादीमध्ये गुंतून राहणे योग्य नाही. यामुळे त्याचा खेळ अधिकच बहरतो. खूप जास्त शाब्दिक चकमकीमुळे कोहली याला बाद करण्याची मुख्य योजना फिसकटण्याचा धोका आहे

मेलबर्न - ""भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली याला डिवचु नका; अन्यथा त्याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही,'' असा इशारा ज्येष्ठ ऑसी खेळाडू मायकेल हसी याने दिला आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान विराट हा ऑस्ट्रेलियाचा "सर्वांत महत्त्वाचा सार्वजनिक शत्रु' असेल, अशी प्रतिक्रियाही हसी याने व्यक्त केली.

भारत व ऑस्ट्रेलियामधील कसोटी सामन्यांच्या मालिकेस येत्या 23 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. कोहली याला चिडविणे ऑस्ट्रेलियास महाग पडू शकण्याचा इशारा देत हसी याने कोहली याला लवकरात लवकर बाद करण्याची योजना आखण्यावर ऑस्ट्रेलियाने लक्ष केंद्रित करावे, असे म्हटले आहे. आशिया खंडामध्ये पाच वा त्यापेक्षा जास्त कसोटी सामने खेळलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांपैकी हसी हा सर्वाधिक सरासरी असलेला फलंदाज आहे. 2013 मध्ये निवृत्ती घेतलेल्या हसी याने 79 कसोटी सामन्यांत 6235 धावा केल्या आहेत.

"ऑस्ट्रेलियाच्या दृष्टिकोनामधून विचार केल्यास कोहली हा सर्वांत महत्त्वाचा सार्वजनिक शत्रु आहे. कोहली याला स्वस्तात बाद करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोहली याला चिडविणे योग्य नाही. कारण तो उत्तम स्पर्धक असून स्लेजिंगमुळे तो अधिक पेटून खेळतो. त्याला आव्हानात्मक परिस्थितीत खेळण्यास आवडते,'' असे हसी याने म्हटले आहे.

"कोहली याच्याबरोबर शाब्दिक वादावादीमध्ये गुंतून राहणे योग्य नाही. यामुळे त्याचा खेळ अधिकच बहरतो. खूप जास्त शाब्दिक चकमकीमुळे कोहली याला बाद करण्याची मुख्य योजना फिसकटण्याचा धोका आहे,'' असा इशारा हसी याने दिला आहे. "या मालिकेचा निकाल कोणत्या संघाने अधिक शाब्दिक चकमकी केल्या, यावर अवलंबून नाही. ज्या संघास आखलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यात यश येईल, त्यालाच मालिकेत विजय मिळविता येईल,' असे सूचक मत हसी याने व्यक्त केले आहे.

भारताकडून खेळताना कोहली याने गेल्या दोन वर्षांत अत्यंत भरीव योगदान दिले आहे. याआधी, 2014 मध्ये मेलबोर्न येथील कसोटी सामन्यादरम्यान कोहली याच्याविरुद्ध स्लेजिंग करण्यात आल्यानंतर त्याने कारकिर्दीमधील सर्वोत्कृष्ट धावसंख्या (169 धावा) उभारण्यात यश मिळविले होते. हा सामना अनिर्णित ठरला होता. या कसोटी मालिकेदरम्यान कोहली याचा ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथ याच्याशीही खटका उडाला होता. या पार्श्‍वभूमीवर, आता भारत व ऑस्ट्रेलियामधील ही कसोटी मालिका अत्यंत रंजक ठरण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Hussey warns Australia against sledging Kohli