esakal | कायमस्वरुपी कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्यास समर्थ- रोहित
sakal

बोलून बातमी शोधा

I am ready, smiles Rohit Sharma when asked about long term captaincy

भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यास ती सांभाळण्यास सक्षम असल्याचे मत आशिया करंडकातील भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले आहे.   

कायमस्वरुपी कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्यास समर्थ- रोहित

sakal_logo
By
वृत्तसंस्था

दुबई : भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यास ती सांभाळण्यास सक्षम असल्याचे मत आशिया करंडकातील भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले आहे.    

भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला अविरत क्रिकेटमुळे आशिया करंडक स्पर्धेत विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सलामीवीर रोहित शर्माकडे सोपविण्यात आली होती. रोहितने फलंदाजी आणि नेतृत्वात त्याच्यावर दाखविलेल्या विश्वासाला सार्थ ठरेल अशी कामगिरी केली. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सातव्यांदा आशिया करंडक स्पर्धेचे विजेतपद पटकावले. 

अंतिम सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी रोहितला भविष्यात संघाचे संपूर्णवेळ नेतृत्व करणार का? असा प्रश्न विचारला असता त्याने नि:संकोचपणे तयारी दाखवली. ''नक्कीच! अशी संधी मिळेल तेव्हा मी आनंदाने कर्णधारपद स्वीकारेन,'' असे तो म्हणाला.

''संघातील प्रत्येक युवा खेळाडूला सर्व सामने खेळायचे असल्याचे मी नेहमी सांगत असतो. मी संघातील प्रत्येक खेळाडूला विश्वासात घेऊन संघाची रणनिती आखत असतो आणि यातूनच नवे खेळाडू घडतात. एखाद्या सामन्यात अपयश आले म्हणून आपल्याला वगळले जाईल असे कोणत्याही खेळाडूला वाटले तर नक्कीच त्याच्या खेळावर याचा परिणाम होईल. प्रत्येकाला पुरेशा संधी देण्याचा मी प्रयत्न करतो, कारण एकाच सामन्यातून कोणाबद्दल अंदाज बांधता येत नाही,'' असे मत त्याने व्यक्त केले.  

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने निदहास करंडक आणि आशिया करंडक अशा दोन मालिका जिंकल्या आहेत. सामन्यानंतर बोलताना रोहितने विजयाचे श्रेय संपूर्ण संघाला दिले. तो म्हणाला, ''संपूर्ण मालिकेत आम्ही सर्वोत्तम खेळ केला आहे, त्यामुळे हे विजेतेपद आम्ही केलेल्या मेहनतीचे फळ आहे.''

loading image