कोहली, स्टोक्‍स हवेतच; पण धोनी, द्रविडचा आदर्शही हवा

वृत्तसंस्था
Tuesday, 7 August 2018

क्रिकेटविश्‍वात विराट कोहली आणि बेन स्टोक्‍ससारखी आकर्षक व्यक्तिमत्त्वे असली, तरी महेंद्रसिंह धोनी आणि राहुल द्रविडसारख्या आदर्श खेळाडूंचीही क्रिकेटला तेवढीच गरज आहे, असे मत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) सचिव डेव्ह रिचर्डसन यांनी व्यक्त केले. 
 

लंडन- क्रिकेटविश्‍वात विराट कोहली आणि बेन स्टोक्‍ससारखी आकर्षक व्यक्तिमत्त्वे असली, तरी महेंद्रसिंह धोनी आणि राहुल द्रविडसारख्या आदर्श खेळाडूंचीही क्रिकेटला तेवढीच गरज आहे, असे मत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) सचिव डेव्ह रिचर्डसन यांनी व्यक्त केले. 

मेरिलीबोन क्रिकेट क्‍लबच्या वतीने आयोजित कौड्रे व्याख्यानात ते बोलत होते. रिचर्डसन म्हणाले, ""क्रिकेटला महानायक हवे आहेत. कॉलिन मिलबर्न्स, फ्रेडी फ्लिंटॉफ, शेन वॉर्न, विराट कोहली किंवा अगदी बेन स्टोक्‍स ही क्रिकेटमधील आकर्षक व्यक्तिमत्त्वे असतील, पण आम्हाला फ्रॅंक वॉरेल, महेंद्रसिंह धोनी, राहुल द्रविडसारख्या खेळाडूंचे आदर्शही हवे आहेत. जेणेकरून क्रिकेट योग्य मार्गावर चालल्याची खात्री बाळगता येईल.'' 

रिचर्डसन यांनी या वेळी आयसीसीसमोर असणाऱ्या आव्हानांचा आणि त्यासाठी करत असलेल्या उपाययोजनांचाही आढावा घेतला. ते म्हणाले, ""अलीकडे क्रिकेटमध्ये मैदानात शाब्दिक चकमकी आणि चेंडू कुरतडणे, पंचांचा निर्णय न पटल्यास खेळायला न जाणे, बाद झाल्यावर चित्रविचित्र हावभाव करणे असे प्रकार वाढत आहेत. आम्हाला विश्‍वासमोर क्रिकेटचा हा चेहरा आणायचा नाही. म्हणूनच धोनी, द्रविडसारख्या खेळाडूंची क्रिकेटला गरज आहे.'' 

मैदानावर खेळाडूंचा आक्रस्ताळेपणा रोखण्यासाठी आयसीसीने कारवाईला सुरवात केली असून, अशा कृत्यात दोषी आढळणाऱ्या खेळाडूस 12 एकदिवसीय सामन्यांची किंवा सहा कसोटी सामन्यांच्या बंदीला सामोरे जावे लागेल, असा इशाराही रिचर्डसन यांनी या वेळी दिला. 

रिचर्डसन यांचे बोल... 
-खेळभावना जपण्याबाबत आयसीसी खेळाडूंना जागरूक करत आहे 
-यजमान संघाने दौऱ्यावर आलेल्या पाहुण्या संघाचा सन्मान करायला हवा 
-प्रत्येक जिंकण्यासाठीच खेळत असतो, पण त्यासाठी काही केले जाऊ नये 
-खेळाडूंवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रशिक्षकांची असते, ती त्यांनी टाळू नये 
-चेंडू कुरतडण्याचे किंवा त्याची स्थिती बदलण्याचे प्रकार वाढत आहेत. यात जर कुणी दोषी आढळला, तर त्याच्या बचावासाठी कुणी पुढे येऊ नये 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICC chief David Richardson statement on dhoni, dravid