आयसीसी क्रिकेट क्रमवारीत राहुलची ४६ क्रमांकाने झेप

पीटीआय
शुक्रवार, 31 मार्च 2017

दुबई - भारताचा सलामीवीर के. एल. राहुल याने आयसीसी क्रमवारीत ४६ क्रमांकाने झेप घेतली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील चमकदार कामगिरीमुळे त्याने ५७ वरून ११ वा क्रमांक गाठला. हा त्याचा कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमांक आहे.

दुबई - भारताचा सलामीवीर के. एल. राहुल याने आयसीसी क्रमवारीत ४६ क्रमांकाने झेप घेतली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील चमकदार कामगिरीमुळे त्याने ५७ वरून ११ वा क्रमांक गाठला. हा त्याचा कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमांक आहे.

राहुलने धरमशालामधील निर्णायक चौथ्या कसोटीत दोन्ही डावांमध्ये अर्धशतके काढली होती. चार कसोटींच्या मालिकेत त्याने अनुक्रमे ६४, १०, ९०, ५१, ६७, ६० व ५१ नाबाद अशी कामगिरी केली. तो आता भारतीय फलंदाजांमध्ये तिसरा आहे. चेतेश्वर पुजारा याचा चौथा क्रमांक सर्वोत्तम आहे, तर विराट पाचव्या स्थानावर आहे. या दोघांची मात्र घसरण झाली. पुजारा दोन, तर विराट एका क्रमांकाने खाली आला. राहुलने अजिंक्‍य रहाणे व मुरली विजय यांना मागे टाकले. रहाणे तीन क्रमांक प्रगती करून १४व्या स्थानावर आला, तर विजयने चार क्रमांक गमावले. तो आता ३४व्या स्थानावर गेला आहे.

गोलंदाजीत रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन यांनी पहिले दोन क्रमांक कायम राखले आहेत. उमेश यादवने पाच क्रमांक प्रगती केली. त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम २१वा क्रमांक गाठला आहे. अष्टपैलूंच्या क्रमवारीत जडेजाने अश्विनला मागे टाकून दुसरा क्रमांक मिळविला. बांगलादेशच्या शकीब अल्‌ हसन याने अव्वल स्थान कायम राखले आहे. जडेजाने धरमशालामध्ये चार विकेट आणि ६३ धावा अशी कामगिरी केली. ‘मालिकेचा मानकरी’ हा पुरस्कार त्याने मिळविला.

स्मिथ अव्वल
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ याच्यासाठी फलंदाज म्हणून ही मालिका फलदायी ठरली. त्याने अव्वल स्थान कायम राखले. न्यूझीलंडचा प्रतिस्पर्धी केन विल्यम्सन याच्यावर त्याने ६१ गुणांची आघाडी घेतली आहे. केन याने दोन क्रमांक प्रगती केली. तो आता दुसरा आला आहे. या मालिकेपूर्वी स्मिथने कोहलीवर ३८ गुणांची आघाडी घेतली होती. स्मिथने तीन शतकांसह ४९९ धावा केल्या. 

Web Title: ICC cricket rankings ranked 46 places Rahul