आयसीसीच्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये राहुल द्रविड

वृत्तसंस्था
Monday, 2 July 2018

आयसीसीच्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश झालेला राहुल द्रविड हा भारताचा पाचवा खेळाडू आहे. यापूर्वी बिशनसिंग बेदी, कपिल देव, सुनिल गावसकर, अनिल कुंबळे यांचा आयसीसी 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश केला गेला आहे.

लंडन : 'द वॉल' अशी ओळख असणारा भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) 'हॉल ऑफ फेम' यादीत समावेश करण्यात आला आहे. डब्लीन येथे एका कार्यक्रमात आयसीसीने राहुल द्रविडचे नाव जाहीर केले. त्याच बरोबर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि इंग्लंडची माजी महिला यष्टीरक्षक आणि फलंदाज क्लेअर टेलर यांचाही आयसीसी 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश करण्यात आला आहे. 

आयसीसीच्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश झालेला राहुल द्रविड हा भारताचा पाचवा खेळाडू आहे. यापूर्वी बिशनसिंग बेदी, कपिल देव, सुनिल गावसकर, अनिल कुंबळे यांचा आयसीसी 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश केला गेला आहे. द्रविड, पॉटिंग आणि टेलर या खेळाडूंची 'हॉल ऑफ फेम'मधील माजी क्रिकेटपटू आणि माध्यमांचे निवडक प्रतिनिधी यांनी निवड केली.

राहुल द्रविड कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये चौथ्या स्थानावर आहे. 'द वॉल' अशी ख्याती असलेल्या राहुल द्रविडची गणना जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये करण्यात येते. गोलंदाजांचा धैर्याने सामना करणारा एक तंत्रशुद्ध फलंदाज आणि सर्वकालीन उत्तम खेळाडू अशा शब्दात आयसीसीने द्रविडची स्तुती केली. गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या द्रविड 164 कसोटी आणि 344 एकदिवसीय सामने खेळला आहे. त्यात त्याने अनुक्रमे 13,288 आणि 10,889 धावा केल्या आहेत. 

''माझ्या कारर्किदीत मी ज्यांना आर्दश मानले आज त्यांच्यासह माझ्या नावाचा समावेश झाला आहे. ही माझ्यासाठी फार सन्मानाची बाब आहे.'' असे मत राहुल द्रविडने व्यक्त केले. त्यानंतर त्याने कुटुंबातील सर्व सदस्य, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनचे आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICC inducts Rahul Dravid in the ICC Hall of Fame