आयसीसी शशांक मनोहरांना सोडण्यास तयार नाही

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) स्वतंत्र कार्याध्यक्षपदाचा शशांक मनोहर यांनी राजीनामा दिला असला, तरी त्याबाबत आयसीसीने अजून निर्णय घेतलेला नाही. विविध संकेत स्थळावरून प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार आयसीसीच अजून मनोहरांना सोडण्यास तयार नाही. त्यांचे मन वळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष डेव्ह कॅमेरॉन यांनी देखील दूरध्वनीवरून त्यांच्याशी याबाबत संपर्क साधल्याचे वृत्त आहे. त्यांनाही मनोहर यांनी दाद दिली नाही. मात्र, आयसीसीच्या सूत्रानुसार मनोहर यांनी पद सोडले असले तरी, आयसीसी त्यांना सोडण्यास तयार नाही. मनोहर यांनी केलेली आयसीसीची नवी महसूल विभागणी सर्वांना समान न्याय देणारी आहे. त्यामुळे ती आगामी बैठकीत मान्य होईल यात शंका नाही, असे कॅमेरॉन यांनी म्हटले आहे. हेच नवे आर्थिक धोरण "बीसीसीआय'ला मंजूर नाही. त्यांच्या वाढत्या विरोधाच्या दडपणामुळेच मनोहर यांनी राजीनामा दिला ही चर्चा कॅमेरॉन यांनी खोडून काढली. ते म्हणाले, ""त्याबाबत मला निश्‍चित माहिती नाही. कुणाच्या दडपणामुळे त्यांनी राजीनामा दिला असेल असे मला वाटत नाही.''
Web Title: The ICC is not ready to leave Shashank manohar