2021 चा T20 वर्ल्ड कप भारतात; ICC ने जाहीर केलं वेळापत्रक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 August 2020

2022 चा टी 20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात येणार आहे. आयसीसीने महिलांचा 2021 चा एकदिवसीय वर्ल्ड कप रद्द केला आहे.

दुबई - सध्या कोरोनाच्या काळात क्रीडा क्षेत्रातही स्पर्धांच्या आयोजनावर परिणाम झाला आहे. दरम्यान, टी 20 वर्ल्ड कप 2021 च्या आयोजनाबद्दल आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. 2021 मध्ये होणाऱ्या या वर्ल्ड कपचे आयोजन भारतात होणार आहे. त्यानंतर 2022 मध्ये पुढचा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात होईल. याचा निर्णय बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख आणि आयसीसी यांच्यात शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

आयसीसीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आता 2021 चा टी20 वर्ल्ड कप भारतात होणार असल्याचं निश्चित झालं आहे. तसंच 2023 चा एकदिवसीय वर्ल्डकप सुद्धा भारतातच होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. 2022 चा टी 20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात येणार आहे. आयसीसीने महिलांचा 2021 चा एकदिवसीय वर्ल्ड कप रद्द केला आहे. महिलांचा वर्ल्ड कप 2022 मध्ये 6 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत होणार आहे. महिलांचा हा वर्ल्ड कप न्यूझीलंडमध्येच आयोजित करण्यात येणार आहे. 

हे वाचा - CPL2020 : कॅरेबियन लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातील गड्याचा बोलबाला

भारतात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपचे आयोजन पुढच्या वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये कऱण्यात  येईल. अंतिम सामना 14 नोव्हेंबरला होणार असल्याचंही आयसीसीने सांगितलं आहे. ऑस्ट्रेलियात 2022 मध्ये होणारा टी20 वर्ल्ड कप ऑक्टोबर नोव्हेंबरमध्येच होणार असून त्याचा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला होणार आहे. 

#IPLचा मागोवा : देशी 'थप्पड' अन् परदेशी खेळाडूंनी गाजली होती स्पर्धा

यंदा ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी20 वर्ल्ड कपचे आयोजन 18 ऑक्टोबरपासून करण्यात येणार होते. मात्र कोरोना व्हायरसमुळे यंदाचा वर्ल्ड कप स्थगित करण्यात आला आहे. टी20 वर्ल्ड कप स्थगित केल्याने इंडियन प्रिमीयर लीगच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. इंडियन प्रिमीयर लीग युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: icc t20 world cup 2021 to be held in india