World Cup 2019 : तयारी सेमी फायनलची; लंकेचं काही खरं नाही!

वृत्तसंस्था
Saturday, 6 July 2019

लीड्‌स ः उपांत्य फेरी निश्‍चित झाल्यामुळे भारतीय संघ उद्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अखेरचा साखळी सामना श्रीलंकेविरुद्ध खेळेल तेव्हा सराव आणि चुका सुधारण्याचेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवेल. भारतीय संघ सध्या गुणतक्‍त्यात दुसऱ्या स्थानावर आहे. हा सामना जिंकून भारत आघाडीवर येईलही, उद्याच ऑस्ट्रेलियादेखील आपला अखेरचा सामना खेळणार असल्यामुळे त्यांचा सामना झाल्यावर पहिले दोन क्रमांक निश्‍चित होतील. 
 

वर्ल्ड कप 2019 :
लीड्‌स ः उपांत्य फेरी निश्‍चित झाल्यामुळे भारतीय संघ उद्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अखेरचा साखळी सामना श्रीलंकेविरुद्ध खेळेल तेव्हा सराव आणि चुका सुधारण्याचेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवेल. भारतीय संघ सध्या गुणतक्‍त्यात दुसऱ्या स्थानावर आहे. हा सामना जिंकून भारत आघाडीवर येईलही, उद्याच ऑस्ट्रेलियादेखील आपला अखेरचा सामना खेळणार असल्यामुळे त्यांचा सामना झाल्यावर पहिले दोन क्रमांक निश्‍चित होतील. 

इंग्लंडच्या उत्तर भागात असलेल्या लीडस्‌ गावातील हेडिंग्ले मैदानावर हा सामना होईल. श्रीलंका संघाने स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात आपली कामगिरी उंचावली आहे. त्यामुळे सुरवात नाही तर नाही शेवट गोड करण्यासाठी श्रीलंका संघ विजयाच्या इर्षेनेच मैदानात उतरणार आहे. साहजिकच भारताला हा सामना एकदम सहज जाणार नाही. 
महंमद शमी आणि फिरकी गोलंदाजांच्या दुसऱ्या स्पेलमध्ये जाणाऱ्या वारेमाप धावा, मधल्या फळीतील फलंदाजीची समस्या आणि फलंदाजी करताना डॉट बॉल्सची संख्या घटवताना स्ट्राइक रोटेशन कसे साध्य करायचे या तीन चुकांवर मात्रा शोधण्याचे काम भारतीय संघ या सामन्यात करेल यात शंका नाही. कारण या तीन चुकांनीच गेल्या तीन सामन्यांत भारताची डोकेदुखी वाढवली आहे. 

कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री मधल्या फळीतील फलंदाजांच्या जागा सतत बदलत असल्याने मधल्या फळीत काहीशी अस्थिरता निर्माण झाली आहे. त्याचा फटका केदार जाधवला बसला आणि धोनीदेखील त्याची झळ सहन करतोय. दोन सामन्यांत रिषभ पंतने अपेक्षा वाढवल्या आहेत. उपांत्य फेरीत पाऊल ठेवण्याअगोदर रिषभ पंतने मोठी खेळी शेवटच्या साखळी सामन्यात केली, तर संघाच्या दृष्टीने ती मोठी जमेची बाजू असेल. गोलंदाजीत महंमद शमीला विकेट मिळविण्याबरोबर धावा रोखण्यावरदेखील भर द्यावा लागेल. त्याचबरोबर अखेरच्या साखळी सामन्यात रवींद्र जडेजाला संधी मिळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्याच्यासाठी दिनेश कार्तिकला बाहेर बसावे लागेल. 

श्रीलंकेचा खेळ चांगला झाला म्हणण्यापेक्षा अपेक्षाभंग करणारा झाला आहे. अनुभवी खेळाडू लसिथ मलिंगाने कमाल कामगिरी केली असताना अँजेलो मॅथ्यूजची कामगिरी सुमार झाली आहे. त्याचा परिणाम मधल्या फळीतील फलंदाजीवर झाला आहे. निकालावर काहीही अवलंबून नसल्याने श्रीलंका बेधडक क्रिकेट खेळायची शक्‍यता नाकारता येत नाही. दिमुथ करुणारत्ने, कुशल परेरा यांच्याबरोबर अविष्का गुणवर्धने यांच्या फलंदाजीकडे नक्कीच लक्ष राहील. 

खेळपट्टीवरचे बरेचसे गवत काढून टाकून रोलिंग केलेले असले तरीही हेडिंग्लेची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना थोडी साथ देईल असे खेळपट्टी तयार करणाऱ्यांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICC World Cup 2019 India vs Sri Lanka match Preview written by Sunandan Lele