ऑस्ट्रेलिया 451; भारत दिवस अखेर 120/1

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 मार्च 2017

ऑस्ट्रेलियाच्या तिखट वेगवान माऱ्यास चोख उत्तर देत भारतीय सलामीवीरांनी 91 धावांची सलामी दिली. यामध्ये के एल राहुल याच्या अर्धशतकाचा (67 धावा - 91 चेंडू) मुख्य वाटा होता.

रांची - भारत व ऑस्ट्रेलियामध्ये खेळविल्या जाणाऱ्या रांची येथील कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 451 धावांत संपुष्टात आल्यानंतर भारतीय समालीमीवीरांनीही आज (शुक्रवार) दमदार फलंदाजी केली. भारताने दिवस अखेर एक बळी गमावत 120 धावा केल्या असून अद्यापी भारत 331 धावांनी पिछाडीवर आहे.

ऑस्ट्रेलियाच्या तिखट वेगवान माऱ्यास चोख उत्तर देत भारतीय सलामीवीरांनी 91 धावांची सलामी दिली. यामध्ये के एल राहुल याच्या अर्धशतकाचा (67 धावा - 91 चेंडू) मुख्य वाटा होता. राहुल याला जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स याने यष्टिरक्षक मॅथ्यु वेडकरवी झेलबाद केले. आज दिवस अखेरीस मुरली विजय (42 धावा - 112 चेंडू) व चेतेश्‍वर पुजारा (10 धावा - 26 चेंडू) हे भारतीय फलंदाज नाबाद आहेत. स्टीव्ह ओकीफ व नॅथन लिऑन या ऑसी फिरकी जोडगोळीस भारताने यश मिळू दिले नाही. या दोघांनी मिळून एकूण 21 षटके टाकली.

तत्पूर्वी, कर्णधार स्टीव्ह स्मिथ (178 धावा - 361 चेंडू) याच्या नाबाद दीडशतकी खेळीच्या सहाय्याने ऑस्ट्रेलियाने साडेचारशे धावांचा टप्पा ओलांडण्यात यश मिळविले.

भारतीय फिरकीपटू रवींद्र जडेजा याने 124 धावांत पाच बळी घेत ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्मिथ याला भक्कम साथ देणारा ग्लेन मॅक्‍सवेल (104 धावा - 185 चेंडू) बाद झाल्यानंतर मॅथ्यू वेड (37 धावा - 50 चेंडू), स्टीव्ह ओकीफ (25 धावा - 71 चेंडू) या तळातल्या फलंदाजांनी उपयुक्त छोटेखानी योगदान देत ऑस्ट्रेलियाचा डाव वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

जडेजा याने अखेरचा फलंदाज जोश हेझलवूड याला चपळाई दाखवत धावबाद केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव एकूण 137.3 षटकांत 451 धावांत संपुष्टात आला. 

Web Title: India 120/1 at the end of day