दोन्ही कर्णधारांच्या परिपक्वतेची कसोटी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

रांची - रांचीमध्ये येत्या गुरुवारपासून (ता. 16) सुरू होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली आणि स्टिव स्मिथ या दोन्ही कर्णधारांच्या परिपक्वतेची कसोटी लागणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम असलेल्या या दोन संघांमधील आक्रमकपणाकडेही सर्वांचे लक्ष असेल.

हे दोन संघ परस्परांविरुद्ध भिडतात तेव्हा काटे की टक्कर अपेक्षित असते. बंगळूर कसोटीत स्टिव स्मिथच्या "ब्रेन फेड' प्रकरणानंतर अधिकच तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर कोहली मैदानावर तसेच मैदानाबाहेरदेखील आक्रमक राहिला होता. स्मिथने झालेल्या चुकीनंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. कर्णधारांच्या दृष्टिकोनाविषयी या घटनेनंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी मत व्यक्त केले होते. त्यामुळे आता तिसऱ्या कसोटीत दोन्ही कर्णधार कसे प्रदर्शन करतात याबाबत उत्सुकता वाढली आहे.

वाघाला पिंजऱ्यात बंद करण्याचा प्रयत्न केला की तो अधिक त्वेशाने हल्ला करतो. बंगळूर कसोटी सामन्यात तसेच घडले. भारतीय संघ पराभवानंतर दडपणाखाली राहील असे वाटले. पण, त्यांनी त्वेषाने खेळ केला. उर्वरित मालिकेतही त्यांच्याकडून असाच खेळ होण्याची शक्‍यता आहे, असे ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक मॅथ्यू वेड याने यापूर्वीच बोलून दाखवले आहे.

मिशेल स्टार्कच्या माघारीमुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. फिरकीस साथ देणाऱ्या खेळपट्टीवर स्टार्कने भारतीय फलंदाजीला हादरे दिले होते. स्टार्कची उणीव पॅट कमिन्स कशी भरून काढतो यावर ऑस्ट्रेलियाची मदार असेल. दुसऱ्या बाजूला भारताचा सलामीवीर मुरली विजय तंदुरुस्त होण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. लोकेश राहुलसाठीही आठवड्याची विश्रांती पथ्यावर पडली आहे.

Web Title: india austrolia test cricket match