भारताने घेतला पराभवाचा बदला; मालिकेत बरोबरी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 25 November 2018

भारतीय क्रिकेट चाहत्यांनी खचाखच भरलेल्या सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या निळ्या भासणार्‍या प्रेक्षागृहाला दिवाळी साजरी करायची संधी भारतीय संघाने दिली. भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन संघाने उभारलेल्या 164 धावांचा यशस्वी पाठलाग करून सामना जिंकत मालिकेत 1-1 बरोबरी साधली.

सिडनी : भारतीय क्रिकेट चाहत्यांनी खचाखच भरलेल्या सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या निळ्या भासणार्‍या प्रेक्षागृहाला दिवाळी साजरी करायची संधी भारतीय संघाने दिली. भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन संघाने उभारलेल्या 164 धावांचा यशस्वी पाठलाग करून सामना जिंकत मालिकेत 1-1 बरोबरी साधली.

भारताने 68 धावांची वेगवान सलामी लाभूनही ऑस्ट्रेलियाला खूप मोठी धावसंख्या गाठता आली नाही. कृणाल पंड्याने चार फलंदाजांना बाद केले. धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी 8 षटकारांचा मारा गोलंदाजांवर करत 20 व्या षटकात विजय खेचून आणला. विराट कोहली 61 धावा काढून नाबाद राहत विजय हाती घेऊनच परतला. 

विजयाकरता 165 धावा करायचे आव्हान उभे असताना रोहित शर्मा आणि शिखर धवनने भारतीय संघाला मस्त सुरुवात करून दिली. कुल्टर नायलला 20 धावा आणि पुढच्याच षटकात स्टोयनसला 22 धावा चोपून काढताना चौकार षटकारांची आतिषबाजी करत दोघा सलामीवीरांनी 28 चेंडूतच अर्धशतक फलकावर लावले. 67 धावसंख्येवर शिखर धवन (41 धावा) आणि रोहित शर्मा दोघेही पाठोपाठच्या षटकात बाद झाले.

स्थिरावलेले दोन फलंदाज बाद झाल्यावर विराट कोहली आणि लोकेश राहुलने जम बसवायला थोडा वेळ घेतला. 10 षटकात 73 धावा करायच्या बाकी होत्या. बाकी गोलंदाजांना मार पडत असताना मॅक्सवेलच्या मार्‍यावर जास्त धावा निघाल्या नाहीत. 12व्या षटकात धावांचे शतक फलकावर लागले. लोकेश राहुलला धावगती वाढवण्यात यश आले नाही आणि मोठे फटका मारायच्या प्रयत्नात तो बाद झाला. पाठोपाठ रिषभ पंत पहिल्या चेंडूवर बाद झाल्याने दडपण वाढले. 
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

भारतीय क्रिकेट चाहत्यांनी खचाखच भरलेल्या सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या निळ्या भासणार्‍या प्रेक्षागृहाला दिवाळी साजरी करायची संधी भारतीय संघाने दिली. भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन संघाने उभारलेल्या 164 धावांचा यशस्वी पाठलाग करून सामना जिंकत मालिकेत 1-1 बरोबरी साधली. #indvsaust20 #INDvsAUS #ViratKohli @virat.kohli @bcci._official

A post shared by SakalSports (@sakalsports) on

दिनेश कार्तिकसह कप्तान कोहली मैदानावर हजर असल्याने शेवटच्या 4 षटकात 40 धावा काढणे शक्य वाटत होते. विराटने‡  34 चेंडूत अर्धशतक पूर्ण करून पाठलाग चालू ठेवला. दिनेश कार्तिकने विराट कोहलीला चांगली साथ दिली. दोघांनी चांगले फटके मारून 20व्या षटकाच्या 4थ्या चेंडूवर विजयी धावा पूर्ण केल्या. 

ऑस्ट्रेलियन कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. सलग तिसर्‍या सामन्यात फिंचला जीवदान मिळाले. 22 धावांवर प्रचंड उंच उडालेला झेल रोहित शर्माला पकडता आला नाही. खराब गोलंदाजी आणि ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा घेत डार्सी शॉर्ट आणि फिंचने अर्धशतकी मजल सहजी गाठली. कुलदीपने फिंचला बाद केल्यावर समोरून क्रुणाल पंड्याने दोन चेंडूंवर शॉर्ट आणि मॅकरमॉटला बाद केले. 

सिडनी क्रिकेट मैदानाच्या मोठ्या सीमारेषांमुळे क्षेत्ररक्षण करताना भारतीय संघाची त्रेधा उडत होती. महत्त्वाच्या फलंदाजांचे झेल सुटले तसेच लांब अंतरावरून जोरात चेंडू फेकता येत नसल्याने फलंदाजांनी बर्‍याच वेळा जास्त धावा पळून काढल्या. सुर मारत चेंडू आडवण्याचे बरेच प्रयत्न चुकल्याने एक धावेच्या जागी फलंदाजाला थेट चौकार मिळाले. 

अॅलेक्स कॅरीच्या 27 धावा आणि नंतर तळात स्टोयनसने 15 चेंडूत नाबाद 25 धावा काढल्याने 160 धावांचा टप्पा ऑस्ट्रेलियाला ओलांडता आला. कुलदीप यादवचा सन्माननीय अपवाद वगळता बाकी चार गोलंदाजांना षटकामागे 8 पेक्षा जास्त धावा चोपल्या गेल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india beat australia 6 wickets and level t20 series