कुलदीपची कमाल, राहुलची धमाल अन् भारताचा विजय

Wednesday, 4 July 2018

फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या डोक्‍यात वेगळी कल्पना होती. त्याने चेंडूला हवा देण्याची हिंमत दाखवली. 14व्या षटकात कुलदीपने कप्तान मॉर्गन, ज्यो रुट आणि जॉनी बेअर्स्टोला एकाच षटकात बाद केले. चार षटकात 24 धावा देताना एकूण 5 फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात पकडणाऱ्या कुलदीप यादवला प्रेक्षकांनी आणि तमाम माजी खेळाडूंनी उभे राहून टाळ्या वाजवत मानवंदना दिली. जोस बटरलरने 69 धावा केल्याने इंग्लंडला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. 

मँचेस्टर : इंग्लंडने 12व्या षटकात धावसंख्येचे शतक पूर्ण झाले होते आणि अवघा एक फलंदाज बाद झाला होता. त्यानंतर कुलदीप यादवने अफलातून फिरकी गोलंदाजी करून एक ना दोन तब्बल 5 फलंदाजांना बाद केले आणि 1 बाद 100 धावसंख्येवरून इंग्लंडचा डाव 8 बाद 159 धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश मिळाले. त्यानंतर विजयाकरीता 160 धावा करताना लोकेश राहुलने नाबाद 101 धावांची जबरदस्त आक्रमक शतकी खेळी सादर करून भारतीय संघाला पहिला सामना सहज जिंकून दिला. कुलदीप यादवला सामन्याचा मानकरी ठरवण्यात आले. 

नाणेफेक जिंकून विराट कोहलीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेहमी टप्पा पकडून गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्‍वर कुमारला लय सापडली नाही. जेसन रॉय आणि जोस बटलरने भारतीय गोलंदाजांना कडाडून हल्ला चढवला. अर्धशतकी भागीदारी करून जेसन रॉय बाद झाला. जोस बटलर आयपीएलची फलंदाजी जणू काही पुढे चालू ठेवत होता. प्रत्येक गोलंदाजाला मनात येईल तिथे तो फटके मारत होता. 
12व्या षटकात इंग्लंडने 100 ची धावा पार केल्या म्हणल्यावर मोठी धावसंख्या उभारण्याचे संकेत मिळाले. 

फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या डोक्‍यात वेगळी कल्पना होती. त्याने चेंडूला हवा देण्याची हिंमत दाखवली. 14व्या षटकात कुलदीपने कप्तान मॉर्गन, ज्यो रुट आणि जॉनी बेअर्स्टोला एकाच षटकात बाद केले. चार षटकात 24 धावा देताना एकूण 5 फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात पकडणाऱ्या कुलदीप यादवला प्रेक्षकांनी आणि तमाम माजी खेळाडूंनी उभे राहून टाळ्या वाजवत मानवंदना दिली. जोस बटरलरने 69 धावा केल्याने इंग्लंडला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. 

159 धावांचा पाठलाग करताना शिखर धवन लगेच बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायची संधी लोकेश राहुलने दोनही हातांनी घट्ट पकडली. इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत राहुलने 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर शांत होण्याऐवजी तो पेटला. प्लंकेटने टाकलेल्या 11 षटकात राहुलने दोन चौकार दोन षटकार ठोकले. त्याचवेळी वर्ल्डकप सामन्यात इंग्लंड संघाने कोलंबियाविरुद्ध पहिला गोल नोंदवला. प्रेक्षक गोलाचा आनंद साजरा करताना राहुलच्या बहारदार फटकेबाजीला दाद देत होते. 

राहुलला रोहित शर्माने चांगली साथ दिली. दोघांनी मिळून 123 धावांची भागीदारी रचून भारताचा विजय सुकर केला. विजयाकरता 29 धावा बाकी असताना रोहित आदील रशीदला बाद झाला. विजयाला गवसणी घालताना लोकेश राहुलने 53 चेंडूत 10 चौकार आणि 5 षटकार मारून शतक साजरे केले तेव्हा कर्णधार कोहलीने त्याला कडकडून मिठी मारली. फक्त दोन फलंदाज गमावून भारतीय संघाने अठराव्या षटकात विजय मिळवला. लोकेश राहुल आणि विराट कोहली नाबाद राहिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India beat England by 8 wickets in first T20 match