कचखाऊ इंग्लंडची जडेजाकडून शिकार

वृत्तसंस्था
बुधवार, 21 डिसेंबर 2016

चेन्नई - भारतीय उपखंडातील खराब कामगिरीने धास्तावलेल्या इंग्लंड संघ पराभवाच्या भीतीने सातत्याने गारठलेला होता. पाचव्या दिवशी भारतीय फिरकीचा सामना करण्याच्या धास्तीखाली त्यांनी अनिर्णित राहणार, हे स्पष्ट दिसत असलेली भारताविरुद्धची पाचवी आणि अखेरची क्रिकेट कसोटीदेखील गमावली. रवींद्र जडेजाच्या प्रभावी फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांमध्ये सलामीची जोडी गमावल्यावर विकेट देण्यात जणू स्पर्धा लागली. त्यात अखेरचे सहा फलंदाज तर 15 धावांतच परतले.

चेन्नई - भारतीय उपखंडातील खराब कामगिरीने धास्तावलेल्या इंग्लंड संघ पराभवाच्या भीतीने सातत्याने गारठलेला होता. पाचव्या दिवशी भारतीय फिरकीचा सामना करण्याच्या धास्तीखाली त्यांनी अनिर्णित राहणार, हे स्पष्ट दिसत असलेली भारताविरुद्धची पाचवी आणि अखेरची क्रिकेट कसोटीदेखील गमावली. रवींद्र जडेजाच्या प्रभावी फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांमध्ये सलामीची जोडी गमावल्यावर विकेट देण्यात जणू स्पर्धा लागली. त्यात अखेरचे सहा फलंदाज तर 15 धावांतच परतले.

फिरकीचे वादळ कधीही घोंघावणार, या धास्तीने इंग्लंड संघ परतला. मुंबई कसोटीत पहिल्या डावात 400 धावा केल्यावर इंग्लंडने डावाने हार स्वीकारली होती. चेन्नईत पहिल्या डावात पावणेपाचशे धावा केल्या होत्या. चेन्नईतील खेळपट्टी पाचव्या दिवशी तुलनेत फिरकीस जास्त साथ देत होती, हेच त्यांना धास्तावणारे ठरले. शतकी सलामी दिली होती. पण तरीही हार ओढवून घेतली. आकड्यांच्या भाषेत बोलायचे, तर बिनबाद 103 वरून त्यांचे 10 फलंदाज 104 धावांमध्ये परतले होते.

रवींद्र जडेजानेच पहिल्या डावात इंग्लंडला सतावले होते; पण त्याला एकतर्फी हुकमतीपासून इंग्लंडने रोखले होते. फलंदाजीस अजूनही जास्त साथ देत असलेल्या खेळपट्टीवर चेंडू चार दिवसांच्या तुलनेत जरा जास्त वेगाने फिरक घेत होता. थोडासा जास्त उसळतही होता. हेही केवळ अण्णा पॅव्हेलियन एंडच्या बाजूने गोलंदाजी होत असताना घडत होते. त्यामुळे इंग्लंडचा संपूर्ण संघ बांगलादेशातील कसोटीत एका सत्रात कसा बाद झाला होता, याची झलक दिसली.

प्रत्येक चेंडूचा स्वतंत्रपणे विचार करा, याचा विसर पडल्यावर काय घडते, याचा फटका ऍलिस्टर कूकला बसला. तो सातत्याने फिरकीस अडखळत होता. अर्धशतक एक धावा दूर असतानाही चकतो हे पाहिल्यावर तो जास्तच अस्वस्थ झाला. अगोदरच्या चेंडूवर पायचीतच्या अपीलमधून वाचल्यामुळे त्याने पुढचा चेंडू स्विप ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात लेग स्लिपमध्ये झेल दिला. त्याचा सहकारी जेनिंग्स रिव्हर्स स्विपही खेळत होता. तो सतत पुढे येत आहे, हे पाहिल्यावर जडेजाने आखूड टप्प्याचा चेंडू टाकत त्याला झेल द्यायला भाग पाडले.

फिरकीचा सामना करताना स्विप हेच उत्तर नसते, हा धडा आता रूट शिकला असेल. चेंडू काहीसा थांबल्याने जॉनी बेअरस्टॉचा फ्लिक चुकला. त्यातच जडेजाने मिडविकेटवरून स्क्वेअरलेगला जात अप्रतिम झेल घेतला. चहापानानंतर खेळ सुरू झाला, त्या वेळी इंग्लंडच्या सहा विकेट शिल्लक होत्या. मोईन अली, बेन स्टोक्‍स मैदानावर होते. दोघांनी मिळून मालिकेत तीन शतके केली आहेत. तरीही इंग्लंडने अखेरचे सहा फलंदाज 15 धावांत गमावले.

धावफलक ः
इंग्लंड पहिला डाव 477, भारत पहिला डाव 7 बाद 759 घोषित, इंग्लंड दुसरा डाव ः
ऍलिस्टर कूक झे. राहूल गो. जडेजा 49, केटॉन जेनिंग्स झे. व. गो. जडेजा 54, ज्यो रुट पायचित गो. जडेजा 6, मोईन अली झे. अश्‍विन गो. जडेजा 44, जॉनी बेअरस्टॉ झे. जडेजा गो. शर्मा 1, बेन स्टोक्‍स झे. नायर गो. जडेजा 23, जोस बटलर नाबाद 6, लियाम डॉसन त्रि. गो. मिश्रा 0, आदिल रशिद झे. जडेजा गो. यादव 2, स्टुअर्ट ब्रॉड झे. पुजारा गो. जडेजा 1, जॅक बॉल झे. नायर गो. जडेजा 0, अवांतर 21 एकूण 88 षटकांत सर्वबाद 207
बाद क्रम ः 1-103, 2-110, 3-126, 4-129, 5-192, 6-193, 7-196, 8-200, 9-207
गोलंदाजी ः इशांत शर्मा 10-2-17-1, आर. अश्‍विन 25-6-56-0, रवींद्र जडेजा 25-5-48-7, उमेश यादव 14-1-36-1, अमित मिश्रा 14-4-30-1
सामन्याचा मानकरी ः करुण नायर, मालिकेचा मानकरी ः विराट कोहली

दृष्टिक्षेपात विजय

- पहिल्या डावात पावणेपाचशे धावा तरीही डावाने हार ही नामुष्की कोणत्याही संघावर प्रथमच.
- यापूर्वीचा विक्रम इंग्लंडचाच होता. 1932च्या ऍशेस कसोटीत ओव्हलला 432 धावा केल्यानंतरही इंग्लंड याप्रकारे पराजित झाले होते
- पहिल्या डावात चारशे तरी डावाने हार, ही नामुष्की इंग्लंडवर चौथ्यांदा, त्यात भारताविरुद्ध दोनदा
- पहिल्या डावात चारशे धावा केलेल्या संघास भारताने डावाने एकंदर तिसऱ्यांदा हरवले. 2004 च्या मालिकेत पाकविरुद्ध एक डाव 52 धावांनी विजय
- जडेजाने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना सात बळी घेतले. यापूर्वीची सर्वोत्तम कामगिरी 138 धावांत 6 (वि. आफ्रिका)
- कारकिर्दीत प्रथमच सामन्यात दहा फलंदाज बाद केले.
- जडेजाने मालिकेत प्रथमच निम्मा संघ बाद केला.
- एकाच सामन्यात अर्धशतक, दहा बळी आणि चार झेल अशी कामगिरी करणारा जडेजा हा पहिला अष्टपैलू.
- जडेजाने कूकला मालिकेत सहाव्यांदा बाद केले, या मालिकेत कूकची जडेजाविरुद्धची सरासरी 12.50.
- भारताचे यंदा नऊ कसोटी विजय. ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी. यापूर्वी 2010 मध्ये आठ विजय.

Web Title: India beat England in Chennai test, win the series 4-0