भारतापुढे इंग्लंडचे सपशेल लोटांगण; मोहालीत विजय

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

अश्विन, रवींद्र जडेजा व जयंत यादव हे केवळ गोलंदाजी करताना फिरक घेत नाहीत; तर फलंदाजी करतानाही नाचवतात, याचाच अनुभव इंग्लंडला आला.

मोहाली - गोलंदाजीपाठोपाठ फलंदाजीतही भारतीय क्रिकेटपटूंनी केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे भारताने मोहालीतील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा आठ गडी राखून पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या विजयामुळे भारताला प्रथमच इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याची संधी निर्माण झाली आहे.

दुखापतग्रस्त असूनही हसीब हमीदने केलेल्या चिवट प्रतिकारामुळे भारताला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळविण्यासाठी 102 धावांचे आव्हान पार करावे लागणार होते. भारताने सलामीवीर मुरली विजयला शून्यावर गमाविल्यानंतरही पार्थिव पटेल आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताला विजयाजवळ पोचविले. पुजारा बाद झाल्यानंतर कोहलीने आणि पटेल यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

आज (मंगळवार) सामन्याच्या चौथ्या दिवशी 4 बाद 78 धावांवरून पुढे खेळताना जडेजाने बॅटीला बाद करत भारताला पाचवे यश मिळवून दिले. त्यानंतर बटलर आणि रुट यांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. अखेर जयंत यादवने बटलर बाद केले. त्यानंतर दुखापतग्रस्त असूनही मैदानात उतरलेल्या हमीदने भारतीय गोलंदाजांचा यशस्वीरित्या सामना केला. त्याने वोक्सच्या साथीने संघाची धावसंख्या दोनशेच्या जवळ नेली. अखेर वोक्सला शमीने बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर रशीदही शमीच्या बाउन्सरचा शिकार ठरला. अखेर अँडरसन 5 धावांवर धावबाद होत इंग्लंडचा डाव 236 धावांत संपुष्टात आला होता. त्यानंतर भारताने 2 बाद 104 धावा केल्या. पार्थिव पटेल 67 आणि कोहली 6 धावांवर नाबाद राहिले.

Web Title: India beat England in Mohali test