श्रीलंका दौरा सफल संपूर्ण; ट्‌वेन्टी-20 विजयाने सांगता 

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

श्रीलंकेने रोहित शर्मा आणि लोकेश राहुल हे भारताचे सलामीवीर 42 धावांत तंबूत धाडले. त्या वेळी भारताची धावांची सरासरी फार चांगली नव्हती, तर आवश्‍यक धावांची सरासरी नऊच्या घरात होती. विराटने काही चेंडू सावरण्यासाठी घेतले मात्र त्यानंतर तडाखा सुरू केला त्यामुळे काहीसा कठीण वाटू शकणारा विजय एकदम आवाक्‍यात आला. विराटला तिसऱ्या विकेटसाठी मनीष पांडने चांगली साथ दिली. या दोघांनी 119 धावांची भागीदारी केली. 

कोलंबो : विराट कोहलीच्या आणखी एका तडाखेबंद खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेत आणखी एक विजय मिळवला. प्रथम कसोटी, त्यानंतर एकदिवसीय आणि आज ट्‌वेन्टी-20 विजय अशी त्रिवेणी कामगिरी करणाऱ्या भारताने श्रीलंका दौऱ्याची विजयाने सांगता केली. या मालिकेतील नऊच्या नऊ सामने भारताने जिंकले. 

एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांत दणकेबाज शतके करणाऱ्या विराटने आपल्या बॅटचे पाणी श्रीलंकेच्या गोलंदाजांना पाजले. त्याची 54 चेंडूंतील 82 धावांची खेळी श्रीलंकेचे 171 धावांचे आव्हान पार करण्यास निर्णायक ठरली. 
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 170 अशी मजल मारली. भारतीय गोलंदाज तसेच फलंदाजांना प्रथमच आज श्रीलंकेकडून चांगला प्रतिकार मिळाला; परंतु विराट कोहली फॉर्मात असल्यावर श्रीलंकेच्या उरल्या सुरल्या आशाही मावळल्या. भारताने हा सामना सात विकेटने जिंकला 

श्रीलंकेने रोहित शर्मा आणि लोकेश राहुल हे भारताचे सलामीवीर 42 धावांत तंबूत धाडले. त्या वेळी भारताची धावांची सरासरी फार चांगली नव्हती, तर आवश्‍यक धावांची सरासरी नऊच्या घरात होती. विराटने काही चेंडू सावरण्यासाठी घेतले मात्र त्यानंतर तडाखा सुरू केला त्यामुळे काहीसा कठीण वाटू शकणारा विजय एकदम आवाक्‍यात आला. विराटला तिसऱ्या विकेटसाठी मनीष पांडने चांगली साथ दिली. या दोघांनी 119 धावांची भागीदारी केली. 

तत्पूर्वी श्रीलंकेच्या फलंदाजांनी आर या पार असेच धोरण अवलंबिले होते. पहिल्या सहा षटकांत जवळपास दहा धावांच्या सरासरीने त्यांनी धावा केल्या; परंतु या हाणामारीच्या पवित्र्यात त्यांनी टप्प्याटप्प्याने विकेटही गमावल्या. दिलशान मुनावीराचे वेगवान अर्धशतक आणि अशान प्रियांजनची सावध खेळी श्रीलंकेला 170 धावांपर्यंत नेणारी ठरली. भारताकडून चहलने तीन, तर कुलदीपने दोन विकेट मिळवले. 

संक्षिप्त धावफलक : श्रीलंका : 20 षटकांत 7 बाद 170 (निरोशान डिकवेला 17 -14 चेंडू, 3 चौकार, दिलशान मुनावीरा 53 -29 चेंडू, 5 चौकार, 4 षटकार, अशान प्रियांजन 40 -40 चेंडू, 1 चौकार, 2 षटकार, इसुरू उदाना नाबाद 19-10 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, युजवेंदर चहल 4-0-43-3, कुलदीप यादव 4-0-20-2) पराभूत वि. भारत (लोकेश राहुल 24 -18 चेंडू, 3 चौकार, विराट कोहली 82 -64 चेंडू, 7 चौकार, 1 षटकार, मनीष पांडे नाबाद 51 -36 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार, मलिंगा 4-0-31-1).

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India beat Sri Lanka in t20 match