भारत-इंग्लंड मालिका; उष्णतेची लाट भारताच्या पथ्यावर 

वृत्तसंस्था
Monday, 30 July 2018

भारतीय फलंदाजांवर वेगवान गोलंदाजांद्वारे हल्ला करण्याची इंग्लंडची योजना विफल ठरण्याची शक्‍यता आहे. इंग्लंडमध्ये सध्या आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे खेळपट्टी कोरडी होईल आणि ती भारतीय फिरकी गोलंदाजीस साथ देईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

लंडन - भारतीय फलंदाजांवर वेगवान गोलंदाजांद्वारे हल्ला करण्याची इंग्लंडची योजना विफल ठरण्याची शक्‍यता आहे. इंग्लंडमध्ये सध्या आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे खेळपट्टी कोरडी होईल आणि ती भारतीय फिरकी गोलंदाजीस साथ देईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

इंग्लंडमध्ये जवळपास एक महिना उष्णतेची लाट आहे. त्यामुळे खेळपट्टीतील जिवंतपणाच निघून गेला असेल. त्याचमुळे एजबस्टनची खेळपट्टी कोरडी होईल आणि ती फिरकीस साथ देण्याची शक्‍यता आहे. हे लक्षात घेऊनच इंग्लंडने फिरकी गोलंदाजांची निवड केली आहे. खेळपट्टीचे स्वरूप लक्षात घेऊन विराट कोहली तीन फिरकी गोलंदाजांचीही निवड करू शकतो, असे मत इरापल्ली प्रसन्ना तसेच मनिंदर सिंग या दिग्गज फिरकी गोलंदाजांनी व्यक्त केले. 

सध्याची परिस्थिती इंग्लंडपेक्षा भारतास जास्त अनुकूल आहे, असे मानले जात आहे; पण भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांना हे मान्य नाही. वातावरणाशी जुळवून घेणे सर्वांत जास्त महत्त्वाचे असते. जोहान्सबर्गमध्ये आपल्याला हे साध्य झाले. त्यामुळेच आपण तिथे जिंकलो. आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून आपण काय शिकलो आहोत, त्याचे प्रतिबिंब या दौऱ्यात दिसेल. इंग्लंड गोलंदाजांची सुरवातीस 25-30 षटके चांगल्याप्रकारे खेळून काढणे तसेच 25-30 धावांचे रूपांतर शतकात करण्याकडे लक्ष देणे फलंदाजांसाठी महत्त्वाचे आहे. इंग्लंडमधील सध्याचे वातावरण बघता प्रतिस्पर्धी संघ किमान दोन फिरकी गोलंदाज खेळवतील. भारताने तीन फिरकी गोलंदाज खेळवले तरी मला आश्‍चर्य वाटणार नाही. फिरकी गोलंदाजांना सध्याच्या वातावरणाची तसेच खेळपट्टीची साथ लाभेल. संघाचे आक्रमक धोरणही फिरकी गोलंदाजांच्या पथ्यावर पडेल, असे मत इरापल्ली प्रसन्ना तसेच मनिंदर सिंग यांनी व्यक्त केले. इंग्लंडच्या रशीद अली, मोईन अली यांनीही प्रभावी कामगिरी केली आहे, याकडे प्रसन्ना लक्ष वेधतात. रशीद तर भारतीय फलंदाजांची अनेकदा डोकेदुखी ठरला आहे. भारत दौऱ्यात मोईन अली प्रभावी ठरला होता, असे प्रसन्ना यांनी सांगितले. 

सध्याचे इंग्लंडमधील वातावरण भारतासारखे आहे, असे अनेकांना वाटत असेल; पण खेळपट्टी वेगळी असणार तसेच मैदानही, त्याचबरोबर वातावरणही. इंग्लंडमध्ये हवामान कसेही असले तरी चेंडू मूव्ह होणारच. - रवी शास्त्री, भारतीय मार्गदर्शक 

कोरड्या खेळपट्टीवर भारतीय फिरकी गोलंदाज चेंडूला चांगलीच फिरक देऊ शकतील. वुर्स्टरशायरकडून खेळण्याचा अनुभव अश्‍विनसाठी फायदेशीर ठरू शकेल. या खेळपट्टीवर चायनामन कुलदीप यादवही धोकादायक ठरू शकतो. - इरापल्ली प्रसन्ना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India England test series