भारत-इंग्लंड कसोटी मालिका, बदलत्या हवामानाचीच चर्चा अधिक 

सुनंदन लेले 
Tuesday, 31 July 2018

बर्मिंगहॅम : भारतीय संघाने जून महिन्याच्या अखेरीस इंग्लंडमधे पाऊल ठेवल्यापासून ते अगदी गेल्या शुक्रवारपर्यंत हवामान चांगले गरम होते. डब्लीन असो वा ब्रिस्टल लंडन असो वा कार्डीफ सगळीकडे आपण घरच्या हवेत खेळतो आहोत, असा भास व्हावा इतकी हवा मस्त गरम होती. गेल्या दोन दिवसांत अचानक काळे ढग संपूर्ण इंग्लंडवर दाटून यायला लागलेत. तुरळक पाऊस पडला आणि हवामानात एकदम गारवा आला आहे. गरम हवामानाने मर्यादित षटकांच्या सर्व सामन्यांदरम्यान खेळपट्ट्या कोरड्या होत्या, ज्याचा फायदा फिरकी गोलंदाजांना झाला.

बर्मिंगहॅम : भारतीय संघाने जून महिन्याच्या अखेरीस इंग्लंडमधे पाऊल ठेवल्यापासून ते अगदी गेल्या शुक्रवारपर्यंत हवामान चांगले गरम होते. डब्लीन असो वा ब्रिस्टल लंडन असो वा कार्डीफ सगळीकडे आपण घरच्या हवेत खेळतो आहोत, असा भास व्हावा इतकी हवा मस्त गरम होती. गेल्या दोन दिवसांत अचानक काळे ढग संपूर्ण इंग्लंडवर दाटून यायला लागलेत. तुरळक पाऊस पडला आणि हवामानात एकदम गारवा आला आहे. गरम हवामानाने मर्यादित षटकांच्या सर्व सामन्यांदरम्यान खेळपट्ट्या कोरड्या होत्या, ज्याचा फायदा फिरकी गोलंदाजांना झाला. आता बदललेल्या हवामानाचा फायदा वेगवान आणि स्विंग करणाऱ्या गोलंदाजांना होणार, या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. 

इंग्लंड दौऱ्यावर अंगात स्वेटर घालायची पुसटशी आठवण गेल्या सहा आठवड्यांत कोणाला झाली नव्हती. गेल्या दोन दिवसांत स्वेटर चढवल्या शिवाय बाहेर पहायची धास्ती वाटू लागली आहे, इतके हवामान गार झाले आहे. पाऊस खूप पडतोय अशातला भाग नाही, तरी ढग दाटून आल्याने आणि तुरळक का होईना पावसाच्या सरी दिवसभर पडत असल्याने गवताचा रंग बदलून हिरवा व्हायला लागला आहे. गवताचा हिरवा रंग बघायला चांगला वाटतो हे खरे असले, तरी खेळपट्टीवर तो दिसू लागला की फलंदाजांच्या मनात धडकी भरू लागते. यजमान संघाला बदललेल्या हवामानाचा फायदा होईल असाच अंदाज सगळे आत्तापासून वर्तवायला लागले आहेत. 

पहिल्या कसोटी सामन्याअगोदर झालेल्या एकमेव सराव सामन्यातून भारतीय संघाने फार काही साध्य केले असे वाटत नाही. फलंदाजांना अपेक्षित सूर गवसला नाही. चेतेश्‍वर पुजारा आणि शिखर धवनला दोनही डावात सपशेल अपयश आले ज्याने संघ निवडीची समस्या वाढली आहे. बर्मिंगहॅमला संघ पोचल्यावर पहिला सराव पावसाने रद्द करावा लागला. सोमवारी संघाने जमेल तसा कधी मोकळ्या मैदानावर तर कधी इनडोअर सराव सुविधेचा वापर करून सराव केला. 

सरावानंतर ऍलिस्टर कुकने पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले, ""मी भारतीय संघाविरुद्ध खूप सामने खेळलो आहे. मला वाटते या वेळच्या भारतीय संघाच्या गोलंदाजीत विविधता आणि खोली आहे. अगोदरच्या संघांमधे वेगवान गोलंदाजांकरता जास्त पर्याय नसायचे. आता ते आहेत. इंग्लंडचा संघ 1000 वा कसोटी सामना खेळणार आहे. 2001 मध्ये ऑस्ट्रेलियात जिंकलेले ऍशेस मालिकेतील सामने मला संस्मरणीय वाटतात. लोक ब्रॉड आणि अँडरसनबद्दल नेहमी बोलत राहतात, पण हे दोन दादा गोलंदाज टीकाकारांना चुकीचे ठरवणारी कामगिरी सातत्याने करतात.'' 

फलंदाजांसारखाच गोलंदाजांनी संयम राखणे गरजेचे : रहाणे 
इंग्लंडच्या हवेत परीक्षा फक्त फलंदाजांची नाही, तर गोलंदाजांचीही बघितली जाते. आपल्या गोलंदाजीत दम आहे यात शंका नाही. दक्षिण आफ्रिकेत कोणी अपेक्षा केली नसताना सर्व कसोटी सामन्यात आपण समोरच्या संघाचे फलंदाज बाद केले होते. आत्ताच्या भारतीय गोलंदाजांनी दडपण न घेता एक टप्पा आणि दिशा पकडून मारा करायला हवा. त्याचबरोबर भारतीय गोलंदाजीची फळी जगातील सर्वोत्तम आहे, असा विश्‍वास मनात बाळगायला हवा, असे अजिंक्‍य रहाणेने सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India-England Test Series, more talk of changing weather conditions