वानखेडेवर या वेळी गोलंदाजांनाही प्रभावाची संधी? 

शैलेश नागवेकर
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

मुंबई : आंतरराष्ट्रीय असो वा राष्ट्रीय असो; गेल्या कित्येक सामन्यांत गोलंदाजांशी फटकून वागणारी वानखेडेची खेळपट्टी या वेळी गोलंदाजांना साथ देईल, अशी आशा आहे. तिसऱ्या दिवसापासून फिरकीस साथ देणारी खेळपट्टी तयार करण्यात येत असून, सकाळच्या थंड वातावरणामुळे वेगवान गोलंदाजांनाही संधी मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भारत व इंग्लंड यांच्यात गुरुवारपासून सुरू होणारा चौथा कसोटी सामना निकाली ठरू शकेल. 

मुंबई : आंतरराष्ट्रीय असो वा राष्ट्रीय असो; गेल्या कित्येक सामन्यांत गोलंदाजांशी फटकून वागणारी वानखेडेची खेळपट्टी या वेळी गोलंदाजांना साथ देईल, अशी आशा आहे. तिसऱ्या दिवसापासून फिरकीस साथ देणारी खेळपट्टी तयार करण्यात येत असून, सकाळच्या थंड वातावरणामुळे वेगवान गोलंदाजांनाही संधी मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भारत व इंग्लंड यांच्यात गुरुवारपासून सुरू होणारा चौथा कसोटी सामना निकाली ठरू शकेल. 

वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी ही नेहमीच चर्चेत राहिली आहे. 2011 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी स्टेडियमचे नूतनीकरण आणि नव्याने तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीने आपले रंग बदलले आहेत. दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेने 438 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर खेळपट्टी टीकेचा विषय बनली होती आणि त्यामुळे क्‍युरेटर सुधीर नाईक व टीम इंडियाचे तत्कालीन संघ संचालक रवी शास्त्री यांच्यात कलगीतुरा रंगला होता. नाईक आता खेळपट्टीच्या तयारीतून दूर झाले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले दीपक म्हामुणकर यांच्याकडे जबाबदारी आहे. 

भारतातील पारंपरिक खेळपट्टी तयार करण्यावर म्हामुणकर यांनी भर दिला असून, तिसऱ्या दिवसापासून खेळपट्टी फिरकीस साथ देईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, टीम इंडियाकडून कोणत्याही सूचना मिळाल्या नसल्याचे त्यांनी स्पष्टही केले आहे. काही दिवसांपूर्वी खेळपट्टीवर असलेले गवत कापण्यास सुरवात झाली आहे. तसेच पाणीही कमी देण्यात येत आहे. या दोन बाबी खेळपट्टी फिरकीस साथ देण्यास पूरक ठरत असतात. 

सायंकाळी दव पडत असल्यामुळे आम्ही खेळपट्टीवर पाणी कमी देत असल्याचे म्हामुणकर यांनी सांगितले. ते म्हणाले, 'सर्वसाधारणपणे झटपट क्रिकेटसाठी आम्ही फलंदाजीस साथ देणारी खेळपट्टी तयार करत असतो; परंतु कसोटी सामन्यासाठी फलंदाज आणि गोलंदाजांना समान संधी मिळेल, याकडे लक्ष द्यावे लागते. पहिल्या सत्रात वेगवान गोलंदाजांचे चेंडू स्विंग होतील. दुसरा दिवस फलंदाजीस पोषक असेल. मात्र, तिसऱ्या दिवसापासून चेंडू फिरक घेऊ लागेल, असा म्हामुणकर यांचा अंदाज आहे. 

या मोसमात म्हामुणकर यांच्या टीमने या कसोटी सामन्यासाठी उपयुक्त आणि निकाली ठरेल, अशी खेळपट्टी तयार करण्यावर भर दिला. मात्र, या यंदा वानखेडेवर झालेला पहिला रणजी सामना धावांचा पाऊस पाडणारा ठरला होता. महाराष्ट्र वि. दिल्ली या सामन्यात स्वप्नील गुगलेने नाबाद 351 धावांची खेळी केली होती आणि महाराष्ट्राने 635 धावांचा डोंगर उभा केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना दिल्लीने 590 धावा केल्या होत्या; तर त्यांच्या रिषभ पंतनेही 308 धावा केल्या होत्या. 

या सामन्यानंतर खेळपट्टीच्या स्वरूपात बदल करण्यात आला. परिणामी आंध्र व हरियाना सामना निकाली ठरला. दोन्ही संघांतील फिरकी गोलंदाजांसह वेगवान गोलंदाजांनीही प्रभाव पाडला होता. चौथ्या दिवशी हरियानाच्या एका फलंदाजाने शतकही केले होते. 

आजपासून दोन्ही संघांचा सराव 
मोहाली कसोटी एक दिवस अगोदरच संपल्यामुळे दोन्ही संघांना तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीदरम्यान नऊ दिवसांची विश्रांती मिळाली. भारतीय खेळाडू आपापल्या घरी परतले होते. आजपासून खेळाडू मुंबईत येण्यास सुरवात झाली असून, उद्यापासून पुन्हा सराव सुरू होणार आहे. एकीकडे भारतीय खेळाडू विश्रांती घेत असताना अजिंक्‍य रहाणे बीकेसी येथील अकादमीत प्रवीण अमरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसांपासून कसून सराव करत आहे.

Web Title: India to face England in Mumbai at Wankhede Stadium, report by Shailesh Nagwekar