भारत उद्या कामगिरी उंचावणार का?

सुनंदन लेले
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

नाणेफेक मोलाची आहे. पण, म्हणून नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायची असा अर्थ होत नाही. नाणफेकीपेक्षा मला पहिल्या डावात कोण कसा खेळ करतो, यावर सामन्याचे भवितव्य अधिक अवलंबून असेल. कारण, दुसऱ्या डावात विकेट अधिक खराब होणार आहे. आम्ही प्रत्येक मालिकेतील सामन्यातून नवे शिकत असतो. दरवेळेस आम्हाला प्रगती करण्यास वाव असल्याची जाणीव होते आणि आम्ही ती करत आहोत, हे सर्वांत महत्त्वाचे.
- ऍलिस्टर कूक, इंग्लंडचा कर्णधार

विशाखापट्टणम : "कॅचेस विन मॅचेस' या उक्तीची उकल भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात निश्‍चित झाली असेल.

क्षेत्ररक्षणातील सुमार कामगिरीमुळे भारताची पहिल्या सामन्यातील वर्चस्वाची संधी हुकली. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी उभारलेल्या धावांच्या डोंगरासमोर भारतीय खेळाडू शेवटपर्यंत दडपणाखाली खेळले. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटी सामन्यात संधीचे सोने करणाऱ्या संघाच्याच हाती सामन्याची दोरी असणार यात शंका नाही. यात मैदानावरील सर्व आघाड्या आल्याच, त्याबरोबर ऐनवेळी भारतीय संघात स्थान मिळालेल्या लोकेश राहुललादेखील मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवावे लागणार आहे.

कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय कर्णधार विराट कोहली याने असेच काहीसे सांगून भारताच्या तयारीवर प्रकाश टाकला. कोहली म्हणाला, ""मैदानावर समोर आलेल्या संधीचे सोने केले, तरच आम्हाला वर्चस्व राखण्याची संधी मिळणार आहे. यासाठी कामगिरीत सुधारणा दाखवावी लागेल. विशेषतः क्षेत्ररक्षणात आम्हाला कामगिरी उंचवावी लागणार आहे. पहिल्या कसोटीत सोडलेल्या झेलांची किंमत आम्हाला मोजावी लागली होती.

राजकोट कसोटी सामन्यात भारतीय संघाचा काहीसा "शाहिस्तेखान' झाला. जीव वाचला, पण बोटे तुटली. भारताने सामना वाचवला तरी पाहुण्या संघाचे मनोबल निश्‍चित उंचावले असेल. इंग्लंड संघाच्या तीन फलंदाजांनी पहिल्या डावात शतके केली आणि दुसऱ्या डावात सलामीच्या जोडीने मोठी भागीदारी केली. या दोन्ही गोष्टी भारतीय संघासाठी निश्‍चितपणे काळजीच्या आहेत. कोहलीनेदेखील हे मान्य केले. तो म्हणाला, ""दडपणाखाली कसोटी सामना वाचवणे अत्यंत कठीण काम असते. याचा धडा आम्हाला पहिल्या कसोटीत मिळाला. सामना वाचवायचा असताना बऱ्याच गोष्टींवर नियंत्रण ठेवावे लागते. नैसर्गिक आक्रमकता बाजूला ठेवावी लागते म्हणून ते दडपण जास्त भयानक असते. म्हणूनच समोर आलेली संधी छोटीशी असली, तरी ती साधावी लागेल.''

पहिल्या कसोटीच्या तुलनेत येथील खेळपट्टी वेगळी आहे. गवत काढलेले आहे, तर पाणीदेखील अधिक मारले गेले आहे. त्यामुळे आतापासूनच खेळपट्टीवर भेगा दिसून येत आहेत. याच खेळपट्टीवर अमित मिश्राने एक दिवसीय सामन्यात 5 न्यूझिलंड फलंदाजांना मामा बनवले होते. खेळपट्टीचा खरा स्वभाव खरच फिरकीला अतिरिक्त मदत करणाराच राहणार असेल, तर नाणेफेकीचे महत्त्व अजून वाढणार.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल होण्याची शक्‍यता आहे. यातील गौतम गंभीर ऐवजी लोकेश राहुल हा बदल निश्‍चित आहे. दुसरा बदल करायचा झाल्यास वेगवान गोलंदाज इशांत शर्माला स्थान मिळू शकते. इंग्लंड संघ जेम्स अँडरसन परतल्यामुळे गोलंदाजीच्या आघाडीवर काहीसा सुखावला असेल. तो ख्रीस वोक्‍सची जागा घेईल.

Web Title: India to face England in second test cricket match