आघाडी वाढवण्याचेच मुख्य उद्दिष्ट

पीटीआय
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

भारत-न्यूझीलंड
दुसरा एकदिवसीय सामना
वेळ ः दु. 1.30 पासून
स्टार 1 आणि 3

नवी दिल्ली : प्रतिस्पर्धी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना पूरक अशा धरमशालाच्या खेळपट्टीवरही भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व राखल्यानंतर आता त्याच वर्चस्वाने उद्या फिरोजशाह कोटलाच्या मैदानावर भारतीय संघ नव्या जोमाने उतरेल. दुसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचेच मुख्य उद्दिष्ट भारतीय संघाने ठेवले आहे.

एकदिवसीय क्रमवारीत न्यूझीलंड संघ एका क्रमांकाने भारतीय संघाच्या पुढे असला, तरी किमान भारताविरुद्ध तरी त्यांना तीच चमक दाखवता आलेली नाही. धरमशालातील हवामान आणि खेळपट्टी दोन्ही त्यांच्यासाठी पूरक असेच होते. पण, तेथेही त्यांचे खेळाडू फिके पडले. टॉम लॅथम आणि टीम साऊदी खेळले नसते, तर त्यांच्यावर नीचांकी धावसंख्येची नामुष्की ओढवली असती.

प्रमुख गोलंदाजांना विश्रांती देत भारतीय संघाने नव्या दमाचे गोलंदाज उतरवून न्यूझीलंड संघाला पेचात टाकले आणि त्याचाच फायदा भारतीय संघाला झाला. हार्दिक पांड्याने पदार्पणात सर्वोत्तम कामगिरी केली. त्याचवेळी बदली गोलंदाज म्हणून केदार जाधवनेही दोन बळी टिपले.

फलंदाजीत भारताला चांगली सुरवात मिळाली. विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी यांच्याही कामगिरीत सातत्य राहिले. त्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर भारताला रोखणे हे न्यूझीलंडसमोरील आव्हान असेल. त्यामुळे मालिकेत आव्हान कायम राहण्यासाठी न्यूझीलंडला क्षमतेपलीकडे जाऊन खेळ दाखवावा लागेल, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत दौऱ्यात गुणी फलंदाज रॉस टेलरला तीन वेळा शून्यावर परतावे लागले आहे, याचे शल्य न्यूझीलंडला निश्‍चित वाटत असेल. मार्टिन गुप्टिलचे अपयशही त्यांची डोकेदुखी ठरत आहे. कोटलाची संथ खेळपट्टी लक्षात घेता न्यूझीलंड कर्णधार केन विल्यम्सनने त्यांच्या फिरकी गोलंदाजांकडून अपेक्षा बाळगल्यास चूक ठरणार नाही.

या सामन्यासाठी भारतीय संघात बदल अपेक्षित नाही. सुरेश रैना संघाला येऊन मिळाला असला, तरी संघ व्यवस्थापनाने त्याला पूर्ण विश्रांतीसाठी याही सामन्यात स्थान दिलेले नाही. दुसरीकडे न्यूझीलंड संघ टेलर आणि गुप्टिल यांना वगळण्याचा विचार करेल. तसे झाल्यास हेन्‍री निकोल्स आणि मॅट हेन्‍री यांना स्थान मिळेल.

भारत-न्यूझीलंड
दुसरा एकदिवसीय सामना
वेळ ः दु. 1.30 पासून
स्टार 1 आणि 3

Web Title: India to face New Zealand in second ODI at Delhi